गुंतवणूक सोने खरेदीत; तीन महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल साडेआठ हजारांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 02:26 PM2020-07-06T14:26:45+5:302020-07-06T14:30:48+5:30
चांदीही महागली; संभाव्य दरवाढीमुळे गुंतवणुकीसाठी खरेदी सुरू
सोलापूर : लॉकडाऊनच्या तीन महिन्यात सुवर्ण पेढीत दराने चांगलीच उसळी घेतली आहे. या काळात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम आठ हजार पाचशे रुपयांनी ; तर चांदीच्या दरात प्रतिकिलो दहा हजार पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या तीन महिन्यात सोन्याचा दर ८५ हजारांवर जाण्याच्या चर्चेने काही लोकांची गुंतवणूक सोने खरेदीत होत आहे.
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले. मे महिना हा लग्नसराईचा काळ होता. लॉकडाऊनमुळे कुठेच दागिन्यांची खरेदी होऊ शकली नाही. संपूर्ण सराफ बाजार बंद होता. सराफ बाजार सुरू होताच काही कुटुंबांनी नव्या जोडप्यासाठी तयार दागिने खरेदीवर भर दिला. बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली. या काळात बºयापैकी खरेदी झाली तसेच सोन्याच्या दरात आठ हजार पाचशे रुपये तर चांदीच्या दरात १० हजार पाचशे रुपयांनी वाढ झाली. मागील वर्षी मे महिन्यात सोन्याचा दर बत्तीस हजार रुपये होता. या वर्षी हाच दर ४० हजारांवर पोहोचला. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर हा ऐंशी हजारांवर जाईल ही चर्चा सराफ बाजारात, सर्वसामान्यांमध्ये रंगली. परिणामत: काही हौशीवंतांनी जागेच्या गुंतवणुकीला सोने गुंतवणूक हा पर्याय समजायला लागले. ही गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे. जास्त पैसे मिळवून देणारी गुंतवणूक मानली जात आहे. त्यामुळे काहीअंशी गुंतवणुकीचा कल हा दागिन्यांकडे दिसून येतोय.
आॅगस्टनंतर सोन्याचा दर ८५ हजारांवर जाईल असे वाटत नाही; मात्र सध्याच्या दरात काहीअंशी वाढ होऊ शकते. दरवाढीची चर्चा तर बाजारपेठेत रंगली आहे. काही निवडक ग्राहक तयार दागिन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. जर कोरोनावर लस निघाली तर परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि गुंतवणूक घटेल. सध्या काही ग्राहक जुने दागिने आणून मोड घालताहेत. नव्याने गुंतवणूक करत आहेत.
- मिलिंद वेणेगूरकर
सराफ व्यावसायिक
सराफ बाजार हा आता काहीअंशी शेअर बाजारावर अवलंबून राहिला आहे. शेअर बाजारातील पॉलिसीवरून दरात काहीअंशी वाढ झाली. चर्चा रंगली असली तरी यापुढे आणखी वाढ होईल असे वाटत नाही. सोन्यात केलेली गुंतवणूक शाश्वत आणि सुरक्षित मानली जात आहे. ही गुंतवणूक वेळप्रसंगी कामाला येते. यापुढे वाढ होईल अशी परिस्थिती सोलापुरात नाही.
- गिरीश देवरमनी
अध्यक्ष, सराफ असोसिएशन