सोलापुरातील साईबाबा चौक, शनिवार पेठ अन् अशोक चौकातील 'कोरोना' बाधित तीन रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:28 PM2020-05-20T21:28:23+5:302020-05-20T21:28:50+5:30
सोलापुरातील 'कोरोना' बाधित रुग्णसंख्या ४७०; मृतांची संख्या पोहचली ३३ वर
सोलापूर : सोलापूरातील 'कोरोना' बाधितांची संख्या ४७० पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवार रोजी एकूण २१९ अहवाल प्राप्त झाले, यापैकी २०५ निगेटिव्ह तर १४ पॉझिटिव्ह आले आहेत. यात ७ पुरूष आणि ७ महिलांचा समावेश आहे. मृतांची संख्या ३ नं वाढून ३३ झाली आहे.
आत्तापर्यंत एकूण ५००५ स्वॅब चाचणी झाली असून ४८७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ४३६१ निगेटिव्ह तर ४७० पॉझिटिव्ह अहवाल आहेत. अद्याप १७४ अहवाल प्रतिक्षेत आहेत. एकूण मृतांची संख्या ३३ असून यात २० पुरूष, १३ महिला यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या आता १७५ इतकी झाली असून एकूण २६२ जणांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यात १३७ पुरूष तर १२५ महिलांचा समावेश आहे.
या भागातील आहेत ते मृत तिघे
साईबाबा चौक येथील ७४ वर्षीय पुरूष याचा समावेश आहे. ही व्यक्ती १८ मे रोजी उपचारासाठी दाखल झाली याच दिवशी मृत पावली. दुसरी व्यक्ती अशोक चौक परिसरातील ७७ वर्षीय पुरूष असून १३ रोजी उपचारास दाखल झाली होती. १९ मे रोजी मृत पावली. तिसरी व्यक्ती शनिवार पेठ परिसरातील ६४ वर्षीय महिला असून ती ५ मे रोजी उपचारासाठी दाखल झाली होती, १९ मे रोजी मृत पावली.