बांधकाम परवाना घेणाºया मिळकतदारांना महापालिकेतर्फे मिळणार मोफत तीन झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:46 PM2019-07-03T14:46:57+5:302019-07-03T14:49:37+5:30
सोलापुरातील अभिनव उपक्रम; पहिल्या पाच मिळकतदारांना होणार लाभ
राकेश कदम
सोलापूर : महापालिकेचा बांधकाम परवाना मिळविणाºया पहिल्या पाच मिळकतदारांना सोलापूर महानगरपालिकेकडून मोफत तीन झाडे मिळणार आहेत. पावसाळा होईपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून शहरात किमान दहा हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली.
राज्य शासनाने वृक्ष जोपासना हीच निसर्गाची उपासना या योजनेंतर्गत शहरी भागात वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेतला आहे. महापालिकेने शहरात ३० हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कामही सुरू झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने आपल्या स्तरावर लोकांना वृक्ष लागवडीस प्रवृत्त करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बांधकाम परवाना घेणाºया मिळकतदारांना प्लॉटच्या क्षेत्रनिहाय झाडे लावण्याचे बंधन घालण्यात आले.
झाडे जगली तरच वापर परवाना मिळेल, असे बजावण्यात आले आहे. त्यानुसार अनेक लोक झाडे वापर परवान्याच्या फाईलसोबत वृक्ष संवर्धनाचे फोटो जोडत आहेत. याशिवाय बांधकाम परवाना विभागाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. या विभागातून दररोज किमान १० ते १५ जणांना बांधकाम परवाना दिला जातो. यातील पहिल्या पाच जणांना प्रत्येकी तीन झाडे मोफत देण्यात येणार आहेत. शहरातील काही विकासकांनी महापालिकेला ५० ते १०० झाडे मोफत देण्याची तयारी दर्शविली आहे. ही झाडे मिळकतदारांना देण्यात येतील. बांधकाम सुरू असताना ही झाडे जगवायची. वापर परवाना घेताना या वृक्षांचे संवर्धन होत असल्याचे फोटोही जोडायला हवे, असे बंधन घालण्यात आले आहे.
अधिकारी आणि कर्मचाºयांना केली सक्ती
- मिळकतदारांसोबतच बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनाही प्रत्येकी दोन झाडे लावण्याचे फर्मान सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी काढले आहे. बांधकाम विभागात २८ कर्मचारी आणि अधिकारी आहेत. यातील बहुतांश कर्मचाºयांनी आपल्या घरासमोर झाडे लावली आहेत. काही कर्मचारी भाड्याने राहत आहेत. त्यांनी आपल्या घरासमोरील रस्ता अथवा मोकळ्या जागेत झाडे लावावीत, असे सूचविण्यात आले आहे.
वृक्षाअभावी पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. आपण आपल्या स्तरावर वृक्ष लागवडीची चळवळ रुजवणे गरजेचे आहे. बांधकाम परवाना विभागाच्या आवाहनाला मिळकतदार चांगला प्रतिसाद देत आहेत़ वापर परवाना घेण्यापूर्वी फाईलला वृक्ष संवर्धन करीत असल्याचे फोटो जोडले जात आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी मोफत झाडे दिली तर त्यांचा उत्साह आणखी वाढेल, असे आम्हाला वाटते. आमच्या कर्मचाºयांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
- रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता, मनपा.