तीन बसवर दगडफेक
By admin | Published: June 3, 2014 01:06 AM2014-06-03T01:06:21+5:302014-06-03T01:06:21+5:30
चौघे जखमी
पंढरपूर : फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराजांचे बदनामीकारक फोटो टाकल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना पंढरपुरातही निषेध व्यक्त करण्यात आला. हे प्रकरण आटोपते घेतल्यानंतर शहरातील वातावरण निवळले. पण सोमवारी ग्रामीण भागात तीन बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये चार प्रवासी जखमी झाले आहेत. पंढरपूर शहरामध्ये सकाळी दुकाने उघडी ठेवा असे सांगण्यासाठी पोलिसांच्या गाडीमधून व्यापार्यांना आपली दुकाने उघडी ठेवून व्यवहार सुरू ठेवा, असे आवाहन केले. पंढरपूर शहरामधून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम, पो.नि. अशोक कोळी, स.पो.नि. अनिल कदम व सर्व पोलीस कर्मचार्यांनी संचलन केले. हे संचलन इंदिरा गांधी चौक, भोसले चौक, अर्बन बॅँक, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, स्टेशन रोड, सावरकर पुतळा या मार्गाने करण्यात आले. त्याचबरोबर शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी दीपक वाडदेकर, किरण घाडगे, नामदेव भुईटे, सौदागर मोळक, संतोष कवडे, दिलीप देवकुळे यांनी पंढरपुरातील व्यापार्यांना दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन केले. यामुळे शहरात दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकलासपूर येथे एम. एच. १४/बी. पी. ३०७२ व के. ए. २८/एफ १७२९ या बसवर सकाळी साडेअकराच्या सुमारास दगडफेक केली. या दरम्यान एकलासपूर बसस्थानकावर प्रवासी बसमध्ये चढत व उतरत होते. यामुळे बसमधील सुरेश सदाशिव काकडे (रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा), बापूसाहेब खंडू इंगोले, बंडू हनुमंत फाटे (रा. मंगळवेढा) व स्वाती नेताजी शिंदे (रा. कचरेवाडी) यांना दगड लागून ते जखमी झाले. त्याचबरोबर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तुंगत येथे एम. एच. ४०/वाय ५०१६ या बसवर अज्ञात लोकांच्या टोळक्याने दगडफेक केली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.