चांदी नेणाऱ्या आटपाडीच्या तिघांना अटक
By admin | Published: January 20, 2015 12:20 AM2015-01-20T00:20:00+5:302015-01-20T00:21:44+5:30
२२ लाखांची बेकायदेशीर चांदी : बेळगाव पोलिसांची कित्तूर येथे कारवाई
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीहून तमिळनाडूमधील सेलम येथे एका कारमधून बेकायदेशीररीत्या नेण्यात येणाऱ्या ९० किलो चांदीच्या विटा बेळगाव पोलिसांनी जप्त करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील तीनजणांना अटक केली आहे. ही कारवाई कित्तूर येथे करण्यात आली. बाजारभावाने जप्त केलेल्या चांदीची किंमत २१ लाख ७० हजार रुपये आहे . भगवान भांडगर (वय ४५, रा. मायाक्कानगर, आटपाडी, जि. सांगली), सुभाष कोळेकर (३०) आणि विष्णू माळी (५३, रा. मायाक्कानगर, आटपाडी, सध्या रहिवासी तिरु नगर, स्टेट बँक कॉलनी, सेलम, तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक रवी कांते गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे संशयित आरोपी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीहून बेळगावमार्गे तमिळनाडूमधील सेलम येथे बेकादेशीररीत्या चांदी नेत होते. तमिळनाडूमधील कॉलिस गाडीतील (टी एन ४९ यु १८९२) मागच्याआणि समोरच्या सीटच्या खाली चांदीच्या विटा ठेवून सेलम येथे रविवारी (दि. १८) जात होते. त्यावेळी बेळगाव पोलिसांनी पुणे- बंगलोरराष्ट्रीय मार्गावरील कित्तूरजवळ ही गाडी अडविली त्यांना चांदीची माफक कागदपत्रे देता आली नाहीत. जप्त केलेल्या चांदीची किंमत २१ लाख ७० हजार, याशिवाय पाच लाखांची कॉलिस गाडी आणि एक लाख रुपये रोख रक्कमदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी कित्तूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.