सोलापुरातील गड्डा यात्रेत होम मैदानाचे तीन-तेरा वॉकिंग ट्रॅकचे नुकसान, झाडेही तोडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:51 AM2019-01-30T10:51:48+5:302019-01-30T10:54:20+5:30

सोलापूर : गड्डा यात्रेच्या कालावधीत होम मैदानावरील झाडे, वॉकिंग ट्रॅक, बाकडे आदींचे तीन-तेरा होत आहेत. या नुकसानीला आम्ही जबाबदार ...

Three-Thirteen Walking Track Losses on the Home Ground in Gada Yatra in Solapur! | सोलापुरातील गड्डा यात्रेत होम मैदानाचे तीन-तेरा वॉकिंग ट्रॅकचे नुकसान, झाडेही तोडली !

सोलापुरातील गड्डा यात्रेत होम मैदानाचे तीन-तेरा वॉकिंग ट्रॅकचे नुकसान, झाडेही तोडली !

googlenewsNext
ठळक मुद्देनुकसानीला आम्हाला जबाबदार धरू नका, ठेकेदाराचे महापालिकेला पत्र नगर अभियंता संदीप कारंजे यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होम मैदानावर वाहने आणण्यास बंदी घालावी, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी देवस्थान समितीला कळविले होते

सोलापूर : गड्डा यात्रेच्या कालावधीत होम मैदानावरील झाडे, वॉकिंग ट्रॅक, बाकडे आदींचे तीन-तेरा होत आहेत. या नुकसानीला आम्ही जबाबदार असणार नाही, असे पत्र निखिल कस्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त परंपरेनुसार महापालिकेने १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीसाठी होम मैदानाचा ताबा सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला दिला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणाला बाधा येऊ नये, अशा पद्धतीने यात्रेचे नियोजन करावे. बाधा आल्यास या नुकसानीची जबाबदारी देवस्थान कमिटीवर असेल, अशी अट घालून महापालिकेने यावर्षी होम मैदानाचा ताबा दिला आहे. होम मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम निखिल कस्ट्रक्शनला देण्यात आले आहे.

या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी तीन वर्षांसाठी निखिल कस्ट्रक्शनवर सोपविण्यात आलेली आहे. गड्डा यात्रेच्या काळातील मैदानाची अवस्था पाहून निखिल कस्ट्रक्शनच्या व्यवस्थापकांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. मैदानावरील झाडे खराब झाली आहेत. मैदानावर मोठे खड्डे करण्यात आले आहेत. पेव्हर ब्लॉक, बाकडे यांचीही अवस्था खराब होत आहे. याची नोंद आपण करून घ्यावी. मैदानाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असेही व्यवस्थापकांनी कळविले आहे. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी मैदानाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

आराखड्याबाहेर स्टॉल
- देवस्थान कमिटीने यात्रेसाठी आराखडा तयार केला होता. या आराखड्याला मंजुरी देताना महापालिकेने काही सूचना केल्या. त्यातील काही सूचना दुरुस्त करण्यात आल्या. पण आराखड्याच्या बाहेर रस्त्यावर अनेक ठिकाणी स्टॉल टाकण्यात आले आहेत. त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. यात्रेनंतर कारवाई होईल, असे संकेतही दिले होते.

वॉकिंग ट्रॅकवर गाड्या 
- होम मैदानावर वाहने आणण्यास बंदी घालावी, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी देवस्थान समितीला कळविले होते. त्यानुसार नॉर्थकोट मैदानाकडे पार्किंगची सोयही करण्यात येत होती. परंतु, सध्या थेट होम मैदानावरच पार्किंग करण्यात येत आहे. गड्डा यात्रेला येणारे अनेक ‘स्मार्ट सोलापूरकर’ वॉकिंग ट्रॅकवर दुचाकी लावत आहेत. वॉकिंग ट्रॅकवर पाणी, कचरा टाकला जात आहे. स्टॉलधारकांचे पाणीही वॉकिंग ट्रॅकवर येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याचे फोटो काढून महापालिकेला देण्यात आले आहेत. 

होम मैदानावरील वॉकिंग ट्रॅकला बाधा येऊ नये म्हणून एका बाजूला पत्रे टाकण्यात आले आहेत. आम्ही अद्याप मैदानाची पाहणी केलेली नाही. काय नुकसान झाले आहे, याचीही माहिती घेतलेली नाही. या सर्व गोष्टी यात्रा झाल्यानंतर पाहता येतील. 
- बाळासाहेब भोगडे
सदस्य, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी. 

Web Title: Three-Thirteen Walking Track Losses on the Home Ground in Gada Yatra in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.