अर्ध्या तासात सोलापुरातील तीन महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 02:28 PM2019-06-27T14:28:03+5:302019-06-27T14:29:55+5:30
चोरांचा धुमाकूळ; तिन्ही महिलांनी सांगितले चोरट्यांचे एकच वर्णन
सोलापूर : बुधवारी सकाळी नवी पेठ, काळी मशीद अन् विजापूर रोडवरील श्रीकृष्ण द्वारकानगरीसमोर असलेल्या ग्रीलमध्ये हात घालून चोरट्यांनी मंगळसूत्र व सोन्याचे दागिने हिसका मारून पळवून नेले. शहरातील गुन्ह्याची सुरूवात बुधवारी सकाळी अशा पद्धतीने झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अर्ध्या तासात तीन ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले.
मंगल भारत पाटील (वय-५५, रा. इरला दाऊतपूर, जि. उस्मानाबाद) या बुधवारी बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी सोलापुरात आल्या. सकाळी ९.१५ वाजता त्या मुलाचा ड्रेस बदलण्यासाठी नवी पेठ येथे गेल्या़ त्या एका साडी दुकानासामोर आल्या असता पाठीमागून मोटरसायकलवर दोन तरूण आले. दोघांनी मंगल पाटील यांना या ठिकाणी लुटमार झाली आहे, आम्ही पोलीस असून तुम्ही तुमचे दागिने पिशवीत ठेवा असे सांगितले. मंगल यांनी २७ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र काढले व पिशवीत ठेवत असताना, मोटरसायकलवरील पाठीमागे बसलेल्या तरूणाने मंगळसूत्र व हार हिस्का मारून काढून घेतले. मंगल पाटील यांनी आरडाओरडा करताच दोघे चोरटे मोटरसायकलवरून पळून गेले.
लता रामचंद्र कुलकर्णी (वय-७८, रा. २७/१२७ तरेकर निवास आनंद, उस्मानाबद) या पती रामचंद्र कुलकर्णी यांच्यासमवेत जावईच्या भावाच्या मुलाचे लग्नकार्य असल्याने एस.टी.ने सोलापुरात आल्या होत्या. लग्नकार्याला वेळ असल्याने एस.टी.स्टॅन्डवरून पायी चालत भाग्यलक्ष्मी बँकेच्या दिशेने निघाल्या होत्या. सकाळी ९.३0 वाजता काळी मशीदजवळील जिजामाता सभागृहसमोरील बालाजी फोटो दुकान समोरून मोटरसायकलवरून दोन तरूण आले. मोटरसायकल चालवणाºया तरूणाने थेट गळ्यातील ६0 हजार रूपये किमतीचे गंठण हिस्का मारून काढून घेतले. लता कुलकर्णी या आरडाओरडा करताच दोघांनी तेथून धूम ठोकली. दोन्ही ठिकाणच्या चोरीप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तिन्ही महिलांनी सांगितले चोरट्यांचे एकच वर्णन...
- नवीपेठ येथील साडी दुकानासमोर, काळी मशीद येथील बालाजी फोटो स्टुडिओ आणि विजापूर रोडवरील श्रीकृष्ण द्वारकानगरी येथे तिन्ही ठिकाणी दोन चोरटे मोटरसायकलवरून आले. चोरट्यांनी गळ्यातील दागिने पळवून नेले. तिन्ही महिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये दोन चोरटे हे ३0 ते ३५ वर्षांचे होते. मोटरसायकल चालवणाºया चोरट्याच्या अंगावर निळा टी-शर्ट व राकाडी रंगाची पँट तर पाठीमागे बसलेल्या चोरट्याच्या अंगावर पांढºया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट असल्याचे वर्णन केले आहे. चोरट्यांचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे.
पत्ता विचारण्याचा बहाणा करून पळवली चेन
- विजापूर रोडवरील श्रीकृष्ण द्वाराकानगरी येथे कमलाबाई पांडुरंग पाटील (वय-६९) या आपल्या घरासमोरील पोर्चमध्ये बसल्या होत्या. सकाळी ९.३0 ते ९.४५ दरम्यान मोटरसायकलवर दोन तरूण आले व डॉ. अपर्णा पाथरूडकर यांच्या दवाखान्याच्या दिशेने पुढे निघून गेले. लगेच गाडी वळवून परत कमलाबाई पाटील यांच्या घराजवळ आले. डॉ. अपर्णा यांचा दवाखाना कोठे आहे अशी विचारणा केली. कमलाबाई यांनी हात करून येथेच पाठीमागे आहे असे सांगत असताना, मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने लोखंडी ग्रीलमध्ये हात घालून गळ्यातील सोन्याची चेन हिस्का मारून पळवून नेली. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.