एनटीपीसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तीन तरुणांना २५ लाखाला फसवले
By रूपेश हेळवे | Published: February 23, 2023 05:17 PM2023-02-23T17:17:02+5:302023-02-23T17:17:24+5:30
याप्रकरणी हिरापूरे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, आरोपी चव्हाण याने २०२० मध्ये विविध पदे भरण्याबाबत जाहिरात दिली.
सोलापूर : एनटीपीसीमध्ये नोकरी लावतो, असे सांगत शहरातील तीन तरुणांकडून २५ लाख रूपये घेत, त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अल्तमश सिराजअहमद हिरापूरे ( वय ३२, रा. संजीव नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सुरज रमेश चव्हाण ( रा. चित्तूर चनम्मा नगर, विजापूर रोड) याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी हिरापूरे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, आरोपी चव्हाण याने २०२० मध्ये विविध पदे भरण्याबाबत जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून फिर्यादीच्या वडिलाने त्या जाहिरातीत दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क केल्यानंतर आरोपी चव्हाण याने आपले मोठमोठ्या मंत्र्यांशी संबंध आहेत, मंत्रालयात ओळखी आहेत, अशा बढाया मारत एनटीपीसीमध्ये नोकरी लावते असे अश्वासन दिले.
यासाठी फिर्यादी हिरापूरे यांच्या कडून ५ लाख ९० हजार रूपये, अहजर शहापूरे याला ज्यूनिअर इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर पदावर नोकरी लावतो असे म्हणत ६ लाख १० हजार व तसेच इम्रान दाऊद पिरजादे ( रा. सिध्देश्वर पेठ) याच्या कडून ६ लाख ५५ हजार असे एकूण २५ लाख ५ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी आरोपी चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपाेनि कुकडे करत आहेत.