वादळाचा तडाखा
By admin | Published: March 1, 2015 02:05 AM2015-03-01T02:05:37+5:302015-03-01T02:05:37+5:30
अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्ह्याला शनिवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. काही भागात तुरीच्या आकाराची गार कोसळली.
यवतमाळ : अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्ह्याला शनिवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. काही भागात तुरीच्या आकाराची गार कोसळली. वादळामुळे अनेक घरावरील टीनपत्रे उडाले असून मोठ्ठाली वृक्षही उन्मळून पडले. या वादळी पावसाचा तडाखा गहू, हरभरा, संत्रा, आंबा आदी पिकांना बसला. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत होत्या. ऐन गहू काढणीच्या वेळी आलेल्या या संकटाने शेतकरी पुन्हा हतबल झाला आहे.
यवतमाळ शहरासह दारव्हा, दिग्रस, उमरखेड, आर्णी, बाभूळगाव या तालुक्यांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. उमरखेड तालुक्यात बिटरगाव येथे वीज कोसळून पांडुरंग मल्हारी चिकणे हा शेतकरी ठार झाला तर त्याची मनोज आणि विशाल ही दोन मुले गंभीर जखमी झाली. उमरखेड तालुक्यात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. यामुळे शेतात काढलेला गहू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. (लोकमत चमू)
कारागृह निवासस्थानाचे छत उडाले
यवतमाळ : शहरात सायंकाळी ४ वाजता झालेल्या वादळी पावसाने चांगलाच कहर केला. शहरातील अनेक वृक्ष उन्मळून पडले असून वादळामुळे कारागृहाच्या निवासस्थानाचे छतही उडाले. वीज तारा तुटल्याने शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरातील अनेक होर्डिग्ज आणि बॅनरलाही मोठा फटका बसला. शहरात सायंकाळी तीन मिमी पावसाची नोंद करण्यात आली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदिरा गांधी मार्केट, नेताजी मार्केटमध्ये वृक्ष ठिकठिकाणी उन्मळून पडले. जय हिंद चौकातील एका दुकानाच्या दर्शनी भागाचे काच कोसळले. कारागृह निवासस्थान कर्मचाऱ्यांसाठी राहण्यायोग्य नाही असे २००० मध्ये सूचित केले होते. मात्र त्यानंतरही त्याची डागडुजी झाली नाही. त्यातच कर्मचारी राहत होती. शनिवारी झालेल्या वादळात या निवासस्थानावरचे छतच उडून गेले. शहर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीतील एका घरावर उंबराचे झाड कोसळले.