‘आजोबा गणपती’ची प्रेरणा घेतली टिळकांनी; ट्रस्टच्या दानशूरतेचाही अनुभव घेतला पूरग्रस्तांनी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:37 PM2019-09-09T14:37:58+5:302019-09-09T14:41:58+5:30

पूरग्रस्तांसाठी दीड लाखाची मदत : स्वातंत्र्य चळवळीला गणेशोत्सवातून मिळाली होती स्फूर्ती

Tilak took inspiration from 'Grandfather Ganapati'; Flood victims also experience the charity of the trust! | ‘आजोबा गणपती’ची प्रेरणा घेतली टिळकांनी; ट्रस्टच्या दानशूरतेचाही अनुभव घेतला पूरग्रस्तांनी !

‘आजोबा गणपती’ची प्रेरणा घेतली टिळकांनी; ट्रस्टच्या दानशूरतेचाही अनुभव घेतला पूरग्रस्तांनी !

googlenewsNext
ठळक मुद्दे सार्वजनिक उत्सवाची बीजे इथे रुजली ! राज्यभरात परंपरेची चळवळ फोफावली !!१८९२ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सोलापूरला आले होते स्वातंत्र्य चळवळीला गती आणायची असेल तर गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात आणला पाहिजे

सोलापूर : सार्वजनिक उत्सवाची बीजे इथे रुजली ! राज्यभरात परंपरेची चळवळ फोफावली !! १८९२ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सोलापूरला आले होते. त्यावेळी आजोबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी स्वातंत्र्य चळवळीतील सोलापुरातील देशप्रेमींच्या संपर्कात आल्यावर टिळकांनाही आश्चर्य वाटले. स्वातंत्र्य चळवळीला गती आणायची असेल तर गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात आणला पाहिजे, हा विचार त्यांना स्वस्त बसू देईना. पुढे वर्षभरातच म्हणजे १८९३ साली त्यांनी श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा घेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. याच श्रद्धानंद समाजाच्या गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची स्फूर्ती मिळाल्याचे ट्रस्टी अध्यक्ष अ‍ॅड. गौरीशंकर फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

समाजातील वंचित लोकांना न्याय मिळवून देताना देशात कुठेही नैसर्गिक संकट आले की संकटमोचन म्हणून मदतीला धावून जाण्याची एक संस्कृती आजोबा गणपती ट्रस्टने टिकवून ठेवली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आजोबा गणपती ट्रस्टने १० क्विंटल गहू, १० क्विंटल तांदूळ, ५० बॉक्स पाण्याच्या बाटल्या, २० बॉक्स बिस्किटे, १ हजार कडक भाकºया, ५० किलो शेंगा चटणी, फरसाण, सॅनिटरी नॅपकिन, साबण, टुथपेस्ट आदी दीड लाखाच्या घरात मदत पाठवून गणेशोत्सवाच्या आधीच मदतीचा श्रीगणेशा केला होता. 

आजोबा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ५०० जणांचा ताफा बहारदार लेझीमचा खेळ सादर करताना त्यांच्यात एक ताल-एक सूर दिसून येतो. ११ दिवस गणेशोत्सवात विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना पूजेसाठी बोलावून त्यांचा मान-सन्मान केला जातो. सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात पदाधिकारी कार्यरत असतात. 

श्रद्धानंद समाज नव्हे एक देशभक्ती
- लाला मुन्शीराम हे लाहोर उच्च न्यायालयात प्रसिद्ध वकील होते. संन्यासाची दीक्षा घेतल्यावर ते स्वामी श्रद्धानंद या नावाने ओळखले जाऊ लागले होते. १८ डिसेंबर १९२६ रोजी एका माथेफिरुने त्यांच्या निवासस्थानी घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सोलापुरात त्यावेळी घटनेचा निषेध नोंदवत सोलापुरातील युवक त्रिपुरांतकेश्वर मंदिरात एकत्र येऊन स्वामी श्रद्धानंद यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे कार्य पुढच्या अनेक पिढीस समजावे यासाठी श्रद्धानंद समाजाची स्थापना करण्यात आली. याच श्रद्धानंद समाजाच्या मार्गदर्शनाखाली आजोबा गणपती मंडळ आणि आता ट्रस्टची वाटचाल होताना त्यांच्या सामाजिक कार्याची उंची दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सामाजिक कार्याची यादी वाचत बसली तर दिवस-रात्र पुरणार नाही, असा कार्याचा चढता आलेख आजोबा गणपती ट्रस्टने ठेवला आहे. 

आजोबा गणपती म्हणजे हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक
- लोकमान्य टिळकांच्या आधी श्रद्धानंद समाज सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव सुरु केला. त्यावेळी माणिक चौकातील सुफीसंत मगरीबशाह बाबा हे अत्यंत श्रद्धेने आजोबा गणपतीचे दर्शन घेत असत. आजही त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक पिढीतील वारसदारांनी ही परंपरा जोपासली आहे. यावरुन आजोबा गणपतीच्या उत्सवात अथवा इतर कार्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक दिसते. 

आजोबा गणपती ट्रस्टमधील पदाधिकारी, सदस्यांमध्ये एकवाक्यता असल्याने सामाजिक कार्य तितक्याच दिमाखाने होत आहे. केवळ ११ दिवस गणेशोत्सवच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस हे सामाजिक चळवळ राबविण्यातच जातात. मनातील आशा, अपेक्षा पूर्ण करणारा आजोबा गणपती म्हणून गणेशभक्तांची धारणा आहे.
-अ‍ॅड. गौरीशंकर फुलारी, ट्रस्टी अध्यक्ष.

लोकमान्य टिळकांनी आजोबा गणपतीची प्रेरणा घेत गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. सोलापूरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘कायकवे कैलास’ म्हणजे ‘कर्म हीच पूजा’, ‘कर्म हेच स्वर्ग’ या भावनेतून सामाजिक चळवळ राबवताना समाजाचे देणे फेडण्याचे काम आजोबा गणपती ट्रस्ट करते आहे.
-चिदानंद वनारोटे, ट्रस्टी उपाध्यक्ष.

गेली ४० वर्षे ट्रस्टी अध्यक्ष म्हणून काम करताना अ‍ॅड. गौरीशंकर फुलारी यांनी ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा ठसा उमटविला आहे. आम्हा पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये एकवाक्यात आहे. आजपर्यंत शहरावर नैसर्गिक संकट आले नाही, ही आजोबा गणपतीचीच कृपा म्हणावी लागेल. 
-अनिल सावंत, ट्रस्टी सचिव.

कॅन्सरग्रस्त रुग्णांना अर्थसहाय, सामूहिक विवाह, मुक्या जनावरांसाठी पाणपोई, रक्तदान शिबिरे आदी कैक उपक्रम राबवून सोलापुरातील सामाजिक चळवळ अधिक घट्ट करण्याचे काम आजोबा गणपती ट्रस्टने केले आहे. एवढ्यावरच न थांबता भविष्यात अजून काय करता येईल का, याचा विचार ट्रस्ट करणार आहे.
-कमलाकर करमाळकर, ट्रस्टी सहसचिव.

केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला, गणेश जयंतीला भाविकांची खूप मोठी गर्दी असते. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांमध्ये एक श्रद्धा आहे. विसर्जन मिरवणुकीदिवशी मार्गावर प्रत्येकाच्या घरासमोर, दुकानासमोर आजोबा गणपतीची पूजा करताना भाविक स्वत:ला धन्य मानतात.
-चंद्रशेखर कळमणकर, ट्रस्टी खजिनदार.

आजोबा गणपतीची महिमा अगाध आहे. म्हणूनच महाराष्ट्रातीलच नव्हे तर परप्रांतांतील भाविक खास सोलापूरला येऊन आजोबा गणपतीचे दर्शन घेताना साकडे घालतात. त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण होतात. आजोबा गणपतीचे कार्य सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रांद्वारे भाविकांपर्यंत पोहोचवण्यावर भर असेल.
-सिद्धारुढ निंबाळे, प्रसिद्धीप्रमुख.

श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होताना एक मनस्वी आनंद मिळतो. त्याची महिमा प्रिंट, इलेक्ट्रो माध्यमांतून सर्वदूर पोहोचवण्यासाठी मला मिळालेल्या संधीचे मी सोने करणार आहे. यापुढे आजोबा गणपतीचा प्रसार अन् प्रचारावर माझा भर राहील.
-महादेव पाटील, 
प्रसिद्धीप्रमुख. 

Web Title: Tilak took inspiration from 'Grandfather Ganapati'; Flood victims also experience the charity of the trust!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.