सरकारला जाग येईना! भोंगा बंद होताच रिक्षा केली चालू; पापड विकून पोट भरण्याची कुटुंबावर वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:35+5:302021-02-15T14:56:15+5:30
Solapur Textile mill shutdown from last 11 months: मिल कामगार अभिजित चव्हाण हे ११ वर्षांच्या सेवेनंतर बेकार झाले. त्यानंतर त्यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला
बार्शी : टेक्सटाईल मिल गेली ११ महिने बंद आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची भ्रांत असलेल्या या कामगारांनी लघुउद्योग, रोजगाराचा मार्ग निवडला आहे. कामगारांचे युनियन अध्यक्ष अभिजित चव्हाण, ज्ञानेश्वर मगर, प्रशांत सोनवणे यांनी प्रवासी रिक्षा वाहतूक सुरू केली आहे.
रिक्षा व्यवसायावर फेडू शकत नाहीत घराचे हप्ते
मिल कामगार अभिजित चव्हाण हे ११ वर्षांच्या सेवेनंतर बेकार झाले. त्यानंतर त्यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. तत्पूर्वी त्यांनी बँकेकडून गृहकर्ज घेतले होते. त्याचे हप्ते भरणे थांबले आहेत. बँकेेने या थकीत हप्त्यांसाठी आता तगादा लावला आहे. कामगारांचा आर्त टाहो या कामगार पुढाऱ्यांपर्यंत आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मुलांना स्मार्ट फोन घ्यायला पैसे नाहीत
मिलचे काम सुटल्यानंतर नागनाथ जाधव यांनी उदरनिर्वाहासाठी फेरीच्या माध्यमातून पापडविक्री सुरू केली आहे. गल्लोगल्ली फिरून ते पापड विक्री करताहेत. त्यांना दोन लहान मुले असून ती शिक्षण घेताहेत. सध्या ऑनलाईन वर्ग सर्वत्र सुरू असताना या मुलांना परिस्थितीअभावी स्मार्ट फोन घेता आलेला नाही. त्यामुळे अनेकदा ऑनलाईन क्लास करता येत नाही.
मुलाची पोलीस अकॅडमी बंद केली
संजीवनी कुंभार या महिला कामगार अनेक वर्षापासून बार्शी मिलमध्ये काम करीत होत्या. त्यांना मुलगा आणि पती असून पैशाअभावी मुलाने पोलीस अकॅडमी तयारी थांबवली आहे. पतीला मधुमेह, संधिवाताचा त्रास सहन करीत दिवस काढावे लागत आहेत.