सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळले, वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा
By Appasaheb.patil | Published: October 30, 2023 01:06 PM2023-10-30T13:06:46+5:302023-10-30T13:08:20+5:30
मराठवाड्यात जात असलेल्या एसटी गाड्यांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी सकाळपासून सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा लागल्या आहेत. शिवाय मराठवाड्यात जात असलेल्या एसटी गाड्यांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील साखळी उपोषण सुरू आहे. साखळी उपोषणात मराठा समाजासह विविध समाजातील मान्यवर, संघटना, संस्था प्रतिनिधी तसेच राजकीय नेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहर परिसरातील विविध भागातील समाज बांधव साखळी पद्धतीने उपोषणस्थळी हजेरी लावत आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, माढा्, करमाळा, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात सकल मराठा समाजाचे उपोषणासह विविध आंदोलने तीव्र स्वरूपात सुरू आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. याशिवाय अनेक गावात साखळी उपोषण तीव्र करण्यात आले आहेत. काही गावात आत्मक्लेष आंदोलन, मुंडन आंदोलन, प्रतिकात्मक प्रेतयात्रा, प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमारो आंदोलनही करण्यात येत आहे. आंदोलनाचा एसटी बससेवा, पार्सल सेवा व वाहतूकीवर मोठा परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे.