पाळणा लांबवा... दोन मुलांमध्ये अंतर ठेवायचंय, 'अंतरा' इंजेक्शन मोफत मिळतंय
By शीतलकुमार कांबळे | Published: January 27, 2023 04:49 PM2023-01-27T16:49:14+5:302023-01-27T16:50:04+5:30
एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो
सोलापूर : पाळणा लांबविण्यासाठी अनेक पर्याय असताना अंतरा इंजेक्शनचाही आता वापर होत आहे. राज्य सरकारने 'अंतरा' हे गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी याचा प्रभावी वापर होत आहे.
एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो. पण आता 'अंतरा' इंजेक्शनसह 'कॉपर टी' बसवण्याच्या प्रमाणात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यातून नको असलेली गर्भधारणा टाळता येते व गर्भपाताचे प्रमाणही कमी होते..
कोठे मिळेल?
जिल्ह्यातील ७८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), येथे 'अंतरा' इंजेक्शन निःशुल्क दिले जाते. २०१७ पासून अंतरा हे इंजेक्शन वापरात आहे.
'अंतरा' टोचा, तीन महिने बिनधास्त राहा
कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच सोपा आणि सुरक्ष पर्याय आहे. शस्त्रक्रिया न करता गर्भधारणा टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येते. हे इंजेक्शन घेतल्यानंतर महिलांना तीन महिने गर्भधारणेची चिंता राहत नाही.
दुष्परिणाम नाही
कुटुंब नियोजनासाठी अंतरा इंजेक्शन हा सुरक्षित पर्याय आहे. इंजेक्शनमुळे आईच्या दुधावर कोणताही विपरित परिणाम होत नाही. लग्नानंतर पहिले अपत्य उशिरा किंवा दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी या इंजेक्शनचा चांगला वापर होतो. हे इंजेक्शन वापरल्यानंतर शारीरिकदृष्ट्या कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. त्यामुळे हे इंजेक्शन सुलभ असल्याचे स्त्री-रोगतज्ज्ञ सांगतात.
अंतराचा वापर केव्हा?
तीन महिन्यांत एकदा व वर्षातून चार अंतरा इंजेक्शनद्वारे गर्भधारणा रोखली जाणार आहे. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये एखादी गोळी चुकली तर गर्भधारणा होण्याचा संभव अधिक असतो. मात्र अंतरा इंजेक्शनमुळे हे टाळता येणे शक्य आहे.
गर्भपातापेक्षा गर्भनिरोधकांचा व्हावा वापर
गर्भपात करण्यापेक्षा गर्भनिरोधकांचा वापर वाढावा यादृष्टीने कुटुंब कल्याण विभागाने या इंजेक्शनच्या वापरासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले आहेत. इंजेक्शनचा वापर थांबवल्यानंतर सात ते १० महिन्यांनी पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. प्रसूतीनंतरच्या कालावधीमध्ये स्तनदा मातांसाठीही ते उपयुक्त आहे.