महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साडीने बांधून उसाच्या शेतात टाकला
By दिपक दुपारगुडे | Published: July 1, 2024 06:48 PM2024-07-01T18:48:32+5:302024-07-01T18:48:47+5:30
या अनोळखी महिलेच्या सडलेल्या मृतदेहाच्या संदर्भात बार्शी तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
दीपक दुपारगुडे
सोलापूर : बार्शी तालुक्यातील पाथरी येथे एका अनोळखी महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. अज्ञात व्यक्तीने महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह साडीने बांधून उसाच्या शेतात सरीमध्ये टाकून दिल्याची घटना दि. १ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. खून झालेल्या अनोळखी महिलेचे वय २८ ते ३५ असून, महिलेचे शरीर सडून दुर्गंधी सुटलेली होती.
या अनोळखी महिलेच्या सडलेल्या मृतदेहाच्या संदर्भात बार्शी तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शंकर उत्तम गायकवाड (रा. बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाथरी गावातील प्रमोद गायकवाड हे बार्शी-येरमाळा रस्त्यालगत असलेल्या ऊस पिकास खत टाकत असताना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले. त्यावेळी हिरवे रंगाच्या डिझाइन साडीमध्ये हातपाय बांधून व शरीर बांधलेले, फक्त कवटी असलेले व त्याखालील शरीर सडलेल्या महिलेचे अनोळखी प्रेत दिसून आले. प्रेत पूर्णतः सडलेले त्यांची दुर्गंधी सुटलेली होती. प्रेताजवळ तिचे मंगळसूत्र व हातातील बांगड्या पडलेल्या होत्या. तसेच त्या शरीराचा काही भाग हिंस्र प्राण्यांनी खाल्याचे दिसून आले. उसाच्या शेतामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून महिलेस ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने उसाचे शेतात टाकल्याचे दिसून आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित जगदाळे, उपनिरीक्षक चंद्रकांत गुळवे, पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण डिकुळे, धनाजी केकान, अभय उंदरे, प्रदीप केसरे, दादा भांगे, शिवशंकर खराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून सदरचे प्रेत कुजलेले असल्याने डॉ. अशोक ढगे यांनी जागेवरच शवविच्छेदन केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित जगदाळे हे करीत आहे.