आज सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा; साहित्य खरेदीचा प्रस्ताव मागे ठेवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:20 AM2018-03-31T11:20:15+5:302018-03-31T11:20:15+5:30
विलंबाचे कारण केले पुढे, ड्रेनेजच्या विषयावर होणार आज वादळी चर्चा
सोलापूर : मनपा चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना देण्यात येणाºया साहित्याच्या खरेदीचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या सभेत टाळण्यात आला आहे. स्थायी सभा न झाल्यामुळे कर्मचाºयांना आता आणखी एक महिना साहित्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थायी समिती सभापती निवड प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे मार्च महिन्यात स्थायी समितीच्या सभा झाल्या नाहीत. त्यामुळे खरेदीचे प्रस्ताव मान्यतेसाठी अडकले आहेत. असे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आज शनिवार रोजी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेत प्रशासनाने सफाई कर्मचाºयांना साहित्य व गणवेश खरेदीचा ३0 लाख खर्चाचा प्रस्ताव पाठविला होता. पण महापौर शोभा बनशेट्टी यांनी हा प्रस्ताव पुरवणीमध्ये घेतलेला नाही.
मनपा प्रशासनाकडून हा प्रस्ताव उशिरा पाठविण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याचबरोबर १८0 कोटींचे ड्रेनेजचे टेंडर दास आॅफशोअरला देण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे. वास्तविक हे टेंडर मंजुरीसाठी स्थायी सभेकडे जाणार होते. पण स्थायी सभेला विलंब होत असल्याने सर्वसाधारण सभेकडे हे टेंडर पाठविण्यात आले आहे. यामुळे स्थायी समितीचे सदस्य अस्वस्थ झाले आहेत. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दास आॅफशोअरने कमी दराने हे टेंडर भरले असले तरी या कंपनीच्या कामाबाबत नागरिकांची नाराजी आहे. यापूर्वी जुळे सोलापूर, होटगी व विजापूर रोड परिसरातील ड्रेनेजचे काम या कंपनीने केले आहे. हे काम नुकतेच संपण्याच्या मार्गावर असल्याने आहे त्याच मनुष्यबळावर कमी खर्चात आता नवीन ड्रेनेज योजनेचे काम करण्याची तयारी या कंपनीने दाखविली आहे.
ये रे माझ्या मागल्या नको !
- जुळे सोलापुरात काम करताना या कंपनीने बेफिकीरी दाखविल्याने शाळकरी मुलाचा बळी गेला. यामुळे नागरिक संतप्त झाल्याने काम बंद ठेवावे लागले होते. ड्रेनेज खोदाईनंतर रस्त्यांची कामे व्यवस्थितपणे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नवीन काम करताना ही कंपनी याच पद्धतीने काम करेल अशी सदस्यांची तक्रार आहे. त्यामुळे या सभेत या प्रस्तावावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
सभेच्या कार्यक्रम पत्रिकेचा एकही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही. महापौर सभेतील विषय ठरवितात. साहित्य खरेदीच्या प्रस्तावाबाबत मला माहिती नाही. पार्टी मिटिंगमध्ये या विषयावर चर्चा करू.
- संजय कोळी, सभागृहनेते