आज समर्थांची पुण्यतिथी; अक्कलकोट नगरीत दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबराचा नारा
By Appasaheb.patil | Published: April 18, 2023 03:40 PM2023-04-18T15:40:44+5:302023-04-18T15:41:24+5:30
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या ३५ वर्षापासून श्रींची पुण्यतिथी साजरी केली जाते.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४५ व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पहाटे रथोत्सव, विधीवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान, व जिम्नॅशियमचा १५ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या ३५ वर्षापासून श्रींची पुण्यतिथी साजरी केली जाते. या बरोबरच नगर प्रदक्षिणेच्या शेवटच्या सात दिवस रथ सप्ताह असतो, यामध्ये न्यासाच्या रथाचा सहभाग असतो. दरम्यान मंगळवारी पहाटे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर अमोलराजे भोसले यांच्या हस्ते रथाचे पूजन करुन बुधवार पेठेतील समाधी मठाकडे मार्गस्थ करण्यात आले.
महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे पारायण संपन्न झाले. दुपारी ११.३० च्या दरम्यान श्री व अन्नपूर्णा, महाप्रसादाचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व मराठी अभिनेता विलास चव्हाण पुणे, डॉ.प्रसाद प्रधान ठाणे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनायक (बंटी) म्हशीलकर यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठात श्रींना दाखविण्यात आले. यावेळी स्वामीभक्त बहुसंख्येने उपस्थित होते. यानंतर महाप्रसादालयात न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्र पठणाने महाआरती संपन्न झाली व आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आल्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"