आजची संवाद व्यवस्थाच धोक्यात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:18 PM2019-04-06T13:18:14+5:302019-04-06T13:19:09+5:30

आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात माणसं स्वमग्न होत चालली आहेत. कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जा. तुम्हाला माणसं व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकमध्ये गुंतलेली दिसतातच.

Today's communication system is in danger ! | आजची संवाद व्यवस्थाच धोक्यात...!

आजची संवाद व्यवस्थाच धोक्यात...!

googlenewsNext
ठळक मुद्देआज निराशा, ताणतणाव, अनावर राग, व्यसनाधिनता यासारख्या समस्या डोके वर काढताना दिसतात पैशामागे धावताना हातातलं काही महत्त्वाचं निसटून जातंय का याचंही भान गरजेचं आहे

शहरातलं एक सुखवस्तू जोडपं. नवरा-बायको दोघेही जॉबला. सुरुवातीला नवरा नोकरी करायचा. पण पुढे बायकोलाही वाटू लागलं की, आपणही काहीतरी करावं. संसाराला हातभार लावावा. या विचाराने तिनेही स्वत:ला गुंतवून घेतलं. दाम्पत्याला दोन मुले. मुलगा थोरला. मुलगी धाकटी. घर नेहमी गतिमान. प्रत्येकजण व्यस्त. सर्वांची एकत्र भेट फक्त रात्रीच्या जेवणालाच. एकमेकांत संवाद कसला नाहीच आणि अचानक एकेदिवशी मुलगा काहीही न सांगता घरातून निघून जातो. खूप शोध घेतला जातो. मित्रांना, शिक्षकांना फोन. पण कुणालाच कसलीच खबर नाही. हतबल होऊन नवरा-बायको पोलीस स्टेशन गाठतात. तक्रार नोंदवली जाते. तपास चालूच राहतो. घरातला एकुलता एक मुलगा अचानक गायब होतो ही गोष्टच दाम्पत्याला सहन होत नाही. खूप विचार केल्यानंतर मग हळूहळू त्यांना कळतं की, आपण त्याच्याशी फारसं बोलतच नव्हतो. मग त्याच्या मनातलं आपल्याला कसं कळणार? संवाद साधायला हवा होता. पण आता वेळ निघून गेली.

ही आजच्या काळाची प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना रोज घडताहेत. केवळ शहरातच नाही तर खेड्यातसुद्धा. घरं ही केवळ निवासस्थानापुरती उरलीत की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती. घर ही केवळ एक इमारत नसते. ती जिवंत माणसांची एक कौटुंबिक व्यवस्था असते. या व्यवस्थेत प्रेम असतं. आपुलकी असते, जिव्हाळा असतो आणि मुख्य म्हणजे संवाद असतो.

संवाद ही निसर्गाने मानवाला दिलेली एक देणगी आहे. इतर पशुपक्षीही एकमेकांशी संवाद साधतात. पण माणसाचा संवाद मात्र याहून फारच वेगळा आणि उन्नत आहे. तो शब्द संवाद आहे. आपल्या मनातल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य या संवादात आहे. म्हणून तर आपल्या प्राचीन वाङ्मयातही संवाद आहेत. एकमेकांची दु:खं, वेदना विरघळून टाकण्याचं कसब संवादात असतं. म्हणून संवाद करावा. मंगेश पाडगावकरांच्या फार सुंदर ओळी आहेत :

मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरु होऊन पाखराशी बोलायचं.

आज ही संवाद व्यवस्थाच धोक्यात येताना मला दिसत आहे. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात माणसं स्वमग्न होत चालली आहेत. कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जा. तुम्हाला माणसं व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकमध्ये गुंतलेली दिसतातच. मागच्या महिन्यात मी काही कार्यक्रमानिमित्त एका पाहुण्यांकडे गेलो होतो. घरात लांबून आलेल्या पाहुण्यांची वर्दळ होती. पण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. आलेल्या नातेवाईकांशी ओळख करून घेण्यात कुणालाच रस नव्हता. मला प्रश्न पडला, जिवंत माणसांशी संवाद साधण्यातला नैसर्गिक आनंद सोशल मीडियावर चोवीस घंटे पडून राहून मिळत असेल का? कुठेतरी एक कविता मी वाचली होती. त्या कवितेमधला कवी अस्वस्थ असतो. कारण त्याच्या शेजारी राहणाºया त्याच्या मित्राचे वडील वारल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते. त्याला मित्राचे सांत्वन करायचे असते. पण त्याचा ईमेल आयडी जवळ नसल्याचं त्याला दु:ख असतं. म्हणजे शेजारी राहणाºया मित्राचे सांत्वनही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार. किती करंटेपणा हा ! पण हे आजचं वास्तव आहे.

पैसा जगण्यासाठी आवश्यक आहे. पण त्याच्यामागे किती धावायचं याचं एक तारतम्य असायला हवं. पैशामागे धावताना हातातलं काही महत्त्वाचं निसटून जातंय का याचंही भान गरजेचं आहे. कुटुंबात आपण कमावतो कशासाठी? कुटुंबातील सर्व सदस्य सुखी राहावेत यासाठीच ना? मग त्यासाठी फक्त पैसाच गरजेचा नाही तर संवाद देखील हवा आहे. आपल्याला भूक लागते. तशी मनाला देखील भूक लागते. संवादाची. ती नाही भागली तर मग विसंवाद निर्माण होतो. म्हणून आपण आपल्या आई-वडिलांशी, पत्नीबरोबर, मुलांबरोबर मोकळेपणाने बोलायला हवं. संवाद करायला हवा. त्यांचं मत, त्यांचे विचार, त्यांच्या वेदना समजून घ्यायला हव्यात. आज निराशा, ताणतणाव, अनावर राग, व्यसनाधिनता यासारख्या समस्या डोके वर काढताना दिसतात. या सर्वांवर एकच प्रभावी औषध आहे. ते म्हणजे संवाद !
तेव्हा संवादरत व्हा.... !
डॉ. प्रेमनाथ रामदासी, अकलूज
(लेखक हे शिक्षक आहेत.)

Web Title: Today's communication system is in danger !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.