सोलापूर महापालिकेतील विषय समिती सदस्यांच्या आज निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:02 AM2019-04-20T11:02:43+5:302019-04-20T11:04:33+5:30
सोलापूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा; सात समिती सदस्यांची नावे सर्वच पक्षांनी केली निश्चित
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांवरील सदस्यांच्या निवडी आज शनिवार रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत होणार आहेत. सर्वच पक्षांनी आपल्या सदस्यांची नावे निश्चित केली आहेत.
मनपा विषय समित्यांच्या सदस्यांची निवड २० एप्रिल रोजी संपत आहे. नव्या सदस्य निवडीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कामगार व समाजकल्याण, मंडया नि उद्यान, वैद्यकीय साहाय्य नि आरोग्य, विधी समिती, शहर सुधारणा, स्थापत्य आणि महिला व बालकल्याण समितीचा समावेश आहे.
समितीमध्ये भाजपचे चार, शिवसेनेचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा आणि एमआयएमच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. सर्वच पक्षांच्या गटनेत्यांकडून नगरसचिवांना सदस्यांची नावे दिली जातील. शिवसेनेकडून स्थापत्य समितीसाठी अमोल शिंदे, विनायक कोंड्याल, आरोग्य समितीसाठी गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, कामगार कल्याण समितीसाठी राजकुमार हंचाटे, महिला व बालकल्याण समितीसाठी कुमुद अंकाराम, सावित्रा सामल यांची नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे. निवडणूक काळात भाजपच्या कुरबुरी सुरू होत्या. काही नगरसेवकांना प्रचारात सहभागी करून घेण्यात आलेले नव्हते. अनेक कार्यकर्त्यांमध्येही खदखद पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर सदस्यांची नावे थेट सभागृहात कळविली जातील, असे सांगण्यात आले.
चार समित्या भाजप, तीन समित्या सेनेकडे राहणार
- विषय समिती सदस्यांच्या निवडीनंतर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मनपाच्या सत्ताकारणात भाजप व शिवसेनेची युती झाली आहे. विषय समित्यांवरील सभापतींच्या निवडी दोन्ही पक्षांच्या सहमतीने होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी केला आहे. महिला व बालकल्याण, आरोग्य, कामगार व समाजकल्याण ही समिती शिवसेनेकडे तर स्थापत्य, मंडया नि उद्यान, शहर सुधारणा, विधी समिती भाजपच्या ताब्यात राहणार आहे.
पाणीपुरवठ्यावरून गोंधळाची शक्यता
- सत्ताधारी भाजपकडून यंदा पाण्याचे नियोजन झाले नव्हते. पाणीपुरवठ्याच्या जुनाट यंत्रणेत बदल करण्याचे प्रयत्नही झाले नव्हते. निवडणुकीच्या काळात शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिक हैराण झाले. मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यामुळे लोक उशिरा मतदानासाठी आले. या विषयावरूनही मनपाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे.