सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवरील टोल वाढला
By Appasaheb.patil | Published: April 2, 2019 06:37 PM2019-04-02T18:37:52+5:302019-04-02T18:40:57+5:30
१ एप्रिलपासून झाली अंमलबजावणी : सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवर दर आकारणी
सोलापूर : आय़ एल़ अॅण्ड एफ़एस., पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आयआरबीने आता कंत्राटातील नियमांचा आधार घेत वाढीव दराची १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तामलवाडी, वरवडे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी व येडशी टोलनाक्यांवर आता वाहनधारकांना ५ ते १५ रुपये अधिकचा टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे़ या वाढीव टोलमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अॅण्ड एफ़ एस. ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड या दोन कंपन्यांची स्वत:ची गुंतवणूक करून सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार केला. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी वरवडे (ता़ माढा) व सावळेश्वर (ता़ मोहोळ) या दोन्ही ठिकाणी टोलनाका उभारला.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोलापूर ते येडशीपर्यंतचा महामार्ग बनविला. त्या बदल्यात आय़आऱबी, सोलापूर व एऩएच़ए़आय़ पी़आय़यु. यांनी तामलवाडी व येडशी येथे टोलनाका उभा केला़ सोलापूर ते येडशी हा मार्ग ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. सोलापूर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे सोलापूर ते पुणे हे सहा ते सात तासांचे अंतर आता वाहनधारक तीन ते साडेतीन तासांतच पूर्ण करू लागले आहेत़ त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
वरवडे, सावळेश्वरची मुदत २०३१ तर येडशीची २०४४ पर्यंत
- सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अॅण्ड एफ़एस. या कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३० सप्टेंबर २००९ रोजी करार केला आहे. हा करार १९ आॅगस्ट २०३१ रोजी संपणार आहे़ तोपर्यंत टोल वसुली ही सुरूच राहणार असल्याची माहिती टोल कंपनीचे प्रमुख प्रकाशकुमार लाल दास यांनी दिली़
- सोलापूर-येडशी हा महामार्ग पूर्ण केलेल्या आय़ आऱ बी. कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३ मार्च २०१४ रोजी करार केला आहे़ या करारानुसार या मार्गावर टोल सुरू करण्यात आला. ही टोल वसुली २७ मार्च २०४४ पर्यंत असणार आहे.
वाढत्या वाहनांच्या किमती व वाढते इंधनाचे दर यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ त्यात आता टोलच्या वाढीव दराने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़ भाडे परवडत नसल्याने बहुतांश गाड्या चार ते सहा दिवस सोलापुरातच थांबून राहतात़ टोलवाढीमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़
- फारुख शेख,
ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक