सोलापूर जिल्ह्यातील ३१ कारखान्यांकडून ८० लाख मेट्रिक टनाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:17 PM2018-12-28T13:17:46+5:302018-12-28T13:18:51+5:30
सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून, यावर्षी तब्बल ३१ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू ...
सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून, यावर्षी तब्बल ३१ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. २५ डिसेंबरपर्यंत उच्चांकी ८० लाख ३६ हजार ७३९ मे.टन ऊस गाळप झाले आहे.
यंदा एक नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ इतकी असली तरी ३१ साखर कारखान्यांचे गाळप प्रथमच सुरू आहे. मागील वर्षी ३० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी गोकुळ माऊली कारखान्याने हंगाम घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात कारखान्यांनी हंगाम सुरू केला; मात्र तोडणी-वाहतूक करणारे मजूर व वाहने नसल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले नव्हते. याशिवाय शेतकरी संघटनेचे आंदोलन गृहीत धरुन कारखान्यांनी यंत्रणा पुरेशी लावली नव्हती. या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर आता सर्वच ३१ साखर कारखान्यांच्या गाळपाने वेग घेतला आहे.
यावर्षी शंकर सहकारी,संतनाथ (भोगावती), सांगोला सहकारी, स्वामी समर्थ,आर्यन शुगर, विजय शुगर करकंब,शेतकरी सहकारी चांदापुरी व लोकशक्ती शुगर हे कारखाने बंद आहेत. उर्वरित साखर कारखान्यांनी ४५ दिवसात ८० लाख ३६ हजार ७३९ मे.टन ऊस गाळप केले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे गाळप उच्चांकीच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील २३ कारखान्यांचे ५३ लाख २१ हजार ५४७ मे.टन तर पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी ५० लाख ३४ हजार मे.टन गाळप केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखाने ४७ लाख ६२ हजार मे.टन गाळप करून तिसºया क्रमांकावर आहेत.
ऊस गाळपाची राज्यातील स्थिती
- - राज्यात सध्या १८४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असून एकूण ३७८ लाख ५७ हजार मे.टन ऊस गाळप तर ३९२ लाख ७१ हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा सरासरी १०.३७ टक्के पडला आहे.
- - पुणे विभागात ६२, कोल्हापूर विभागात ३६,अहमदनगर विभागात २८,औरंगाबाद विभागात २२,नांदेड विभागात ३२,अमरावती विभागात एक तर नागपूर विभागात तीन कारखाने सुरू झाले आहेत.
- - माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने सर्वाधिक ८ लाख ३२ हजार ४७३ मे. टन ऊस गाळप केला असून ८ लाख ५२ हजार ४०० क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उताराही १०.२४ टक्के मिळाला आहे.