तोतापुरी, पायरीची १५ दिवस प्रतिक्षा; सोलापुरात हापूस, केसर, लालबागची विक्री
By काशिनाथ वाघमारे | Published: April 18, 2023 04:12 PM2023-04-18T16:12:58+5:302023-04-18T16:14:07+5:30
गावरान आंबा नाहीच : क-यांचं लाेणचं करण्याकडे कल
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : शनिवारी, २२ एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून या पार्श्वभूमीवर सोलापुरात हापूस, बदाम, केसर आणि लालबागची आंब्यांची आवक मुबलक प्रमाणात झाली आहे. मात्र तोतापुरी, पायरी, चौसा, तसेरी आंब्यांसाठी १५ दिवसांची प्रतिक्षा आंबेप्रेमींना करावी लागणार आहे. कै-यांचं लोणचं करण्याकडे बहुतांश फळ उत्पादकांचं कल राहिल्याने स्थानिक पातळीवरचा गावरान आंबा अद्याप बाजारात आलेला नाही.
अक्षय तृतीयेला बहुतांश घरांमधील लोक स्वत:च्या पूर्वजांना रस आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून आंबे खायला सुरूवात करण्याची परंपरा आहे. ती यंदाही पाळली जात आहे. बहुचर्चीत ताेतापुरी, तसेरी, पायरी, लंगडा, चौसा, सफेदा, मलेगा आदी आंबा प्रकार हे १५ दिवसात आंध्रमधून येण्याची अपेक्षा आहे.
यंदा वाहतूक दर वाढला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत आंब्यांचा दर मात्र स्थिर असल्याचे बाजार समितीमधील विक्रेते महमदसलीम बागवान यांनी सांगितले. दीड महिन्यांपासून सोलापुरात आंब्यांची आवक सुरू आहे. येत्या १५ दिवसात आणखी आंब्यांची आवक वाढेल असेही सांगितले जात असून त्यामुळे अक्षय तृतीयेनंतर आंब्यांचे दर खाली येतील असा अंदाजही बागवान यांनी व्यक्त केली. सध्या सोलापूर बाजार समितीत दररोज प्रत्येक प्रकारातील २५०० डझन आंब्यांची आवक असल्याचेही ते म्हणाले. याबरोबरच सर्वसामान्यांमध्ये खरेदीचा उत्साह देखील दिसून येत आहे.
आंब्यांचे दर...
हापूस : ५०० ते १००० रु.
बदाम : ८० ते १५० रु.
केसर : १२० ते १८० रु.
लालबाग : १०० रु.
राजापुरी : ६० रु.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"