मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात वाद; गावकऱ्यांना पूल पार करुन यायला सांगितल्यानं नाराजी अन् संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 10:20 AM2020-10-19T10:20:54+5:302020-10-19T10:44:16+5:30
सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले जात आहे. स्थानीक शासकीय अधिकारी ग्रामस्थांना पुलावर या असे सांगत आहेत.
शिवानंद फुलारी
मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंचा पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौरा सुरुवातीला वादात पडला आहे. स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये या भेटीचा वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांनाच पूल पार करुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोलावले आहे. त्यावरुन, हा वाद निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी गावात यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले जात आहे. स्थानीक शासकीय अधिकारी ग्रामस्थांना पुलावर या असे सांगत आहेत. पण, ग्रामस्थ तयार नाहीत. ते म्हणत आहेत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमात सांगवी खुर्द येथून सुरूवात ठरवण्यात आले आहेत. शासकीय अधिकारी आता ऐन वेळी कार्यक्रम बदलत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांना नदीच्या पुलावरून आमची पडझड झालेली घरे आणि नुकसान कसे दिसणार ? हा ग्रामस्थांचा मुद्दा आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी पुलावरुन गावात यावे, असे तेथील सरपंच बबन पवार यांनी लोकमतशी बोलताना म्हटलंय.
उद्धव ठाकरे अक्कलकोटच्या दिशेने रवाना
पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सकाळी साडेनऊच्या सुमाराला सोलापुरात आगमन झाले. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री फ्रेश होण्यासाठी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात जाणार होते. परंतु, विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपला ताफा शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्याचे फर्मान सोडले. शासकीय ताफा अक्कलकोट तालुक्याच्या दिशेने रवाना झाला.
विमानतळावर स्वागत
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीकर, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत खासदार विनायक राऊत आदी हजर होते. विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी काही नेत्यांची जुजबी चर्चा केली. चला आपल्याला थेट शेतकऱ्यांना भेटायचे आहे असे सांगून ताफा अक्कलकोटच्या दिशेने निघण्याचे आदेश पोलिसांना दिले.