ट्रॅक्टर, नांगर, मोबाइल चोरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:23 AM2021-04-27T04:23:12+5:302021-04-27T04:23:12+5:30
फिर्यादी जयसिंग मोहन पवार (रा.पुरी, ता.बार्शी) हे कुसळंब-येडशी शिवारात ट्रॅक्टरद्वारे एम.एच. १३ डीएच ४११० नांगरणी करीत होते. दरम्यान, शंकर ...
फिर्यादी जयसिंग मोहन पवार (रा.पुरी, ता.बार्शी) हे कुसळंब-येडशी शिवारात ट्रॅक्टरद्वारे एम.एच. १३ डीएच ४११० नांगरणी करीत होते. दरम्यान, शंकर शिवाजी काळे (वय २२, रा.तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) याच्यासह आठ-दहा जण तेथे आले. त्यांनी ट्रॅक्टरमधून उतरण्यास सांगितले. त्यानंतर, मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा आरडाओरडा करताच, थोड्या अंतरावर असलेले शेतमालक भागवत दिडवळ हे तेथे आले असता, त्यांनाही मारहाण केली, शिवाय या दोघांंचे हातपाय बांधून ट्रॅक्टर, नांगर व मोबाइल असा सहा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेले. अशी फिर्याद पांगरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, सहा.पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे तत्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. नंतर दोन्ही राज्यमार्गावर नाकेबंदी लावली. तेव्हा एका संशयितास नाव विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच नाव सांगून हा गुन्हा व आमच्या साथीदारांनी केल्याचे कबूल केले, तसेच साथीदाराच्या ट्रकमध्ये एमएच २५ बी ७४६२ मध्ये ट्रॅक्टर, नांगर लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची पाहणी करून तो ट्रॅक्टर, नांगर व ट्रक ताब्यात घेतला. ही कारवाई सहा.पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज भोसले, पोलीस नाईक मनोज जाधव, कुणाल पाटील, पांडुरंग मुंडे, तानाजी डाके, सुनील बोधनवाढ, अर्जुन कापसे, दिगंबर भंडारवाडी, गणेश घुले यांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे करीत आहेत.
फोटो
२६ कुसळंब-क्राईम
चोरून नेला ट्रॅक्टर, नांगर, ट्रक ताब्यात घेऊन आरोपीस अटक केल्यानंतर पांगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी.