दिवाळीत अंगणात पाच दिवस शेणापासून ‘गवळणीं’ची परंपरा ग्रामीण भागात अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 08:49 AM2020-11-16T08:49:25+5:302020-11-16T08:49:55+5:30

वयस्कर महिलांकडून कृषिसंस्कृती व लोकसंस्कृतीच्या  ऐतिहासिक ठेव्याची जपणूक

The tradition of ‘gawlani’ from dung for five days in the courtyard on Diwali is still going on in the rural areas | दिवाळीत अंगणात पाच दिवस शेणापासून ‘गवळणीं’ची परंपरा ग्रामीण भागात अजूनही कायम

दिवाळीत अंगणात पाच दिवस शेणापासून ‘गवळणीं’ची परंपरा ग्रामीण भागात अजूनही कायम

googlenewsNext

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

दिवाळीचा उत्साह आणि उत्सवरंग ग्रामीण भागाने जपून ठेवला आहे. इथल्या मातीला आधुनिकीकरणाचे वारे स्पर्शून जात असले तरी सणोत्सवात अस्सलपणा टिकून आहे. दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱया ‘गवळणीं’ची प्रथा ग्रामीण भागात अजूनही जोपासली जात आहे. शेणात हात घालणाऱ्या नव्या पिढीतील सुशिक्षित महिला उरल्या नसताना सुद्धा ग्रामजीवनाचं आणि स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱया या शेणाच्या गवळणी  पाच दिवस घरासमोर  तयार करून कृषिसंस्कृती व लोकसंस्कृतीच्या या ऐतिहासिक ठेव्याची वयस्कर महिलांकडून जपणूक केली जात आहे.

दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण. प्रत्येकजण हा सण आपापल्या ऐपतीप्रमाणे मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषि संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱया होतात. समृध्द लोकजीवनाचे दर्शन त्यातून घडतं. वेगवेगळय़ा भागात दिवाळी निरनिराळय़ा पध्दतीने साजरी होते. त्यातून लोकजीवनाचंच दर्शन प्रकर्षाने होते.

महाराष्ट्रातही दिवाळीच्या आगळय़ा प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱया गवळणी. पूर्वी गावांमध्ये भरपूर गायीगुरे असायची. त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून धनत्रयोदशी दिवशी पहिली गवळण तयार केली गेली . अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवित. लहान मुलीही त्यांना मदत करीत असतात. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठय़ा कल्पकतेने या गवळणी बनवितात. छोटे शेणगोळे बनवून त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जातो. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापर करण्यात येई. कल्पनेतलं एक आटपाटनगरच या गवळणींच्या माध्यमातून उभे केलं जाते. पाच दिवस लोकजीवनातील वेगवगेळय़ा घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येत असे. पाचव्या दिवशी पांडव केले जात.

अंगणाचा कोपरा शेणाने सारवण्यात येतो. त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखविण्यात येतो. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हात-पाय दाबताना दाखविले जाते. काही गवळणी स्वयंपाक करताना दाखविल्या जात. त्यासाठी सुंदर अशी चूलही मांडली जायची, त्यावर शेणाचे तवे दाखवून भाकऱया करीत असलेले दाखविले जायचे. कुणी गवळणी दळणकांडण करताना दाखविल्या जायच्या. त्यासाठी शेणाचेच जाते केले जाई, जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य दळत असल्याचे दाखविले जाई.

काही गवळणी विहीरीवर पाणी भरण्यासाठी निघालेल्या दाखवित. एक हात कमरेवरील घागरीवर आणि दुसरा हात डोक्यावरील घागरीवर धरलेल्या या गवळणी सुंदर दिसत . काही गवळणी डोक्यावरील पाटीत भाजी घेऊन विकायला जात. काही गवळणी घरात देवपूजा मांडत, त्यासाठी शेणाचे देवघर करून त्यात नानाविध देव दाखविले जायचे. काही गवळणी गायीगुरे हिंडविताना दाखविल्या जायच्या. तर काही गुरांना पाणी पाजताना दाखविल्या जायच्या. अंगणात खेळणाऱया गवळणी असत. डोंगर चढणाऱया, जेवण वाढणाऱया, ताक घुसळणाऱया अशा नानाप्रकारच्या गवळणी दाखविल्या जाता. कुणी लेकुरवाळी गवळण कमेरवर बाळाला घेऊन त्याला खेळवत असल्याचे दाखविले जाई. काही जणांना शेणाच्या टोप्या केल्या जातात
गवळणींना सजविण्यासाठी पाना-फुलांचा वापर केला जाई. कापसाच्या फुलांच्या, पानांच्या माळा गवळणींच्या गळय़ात घालत. गवळणींचा हा सारा संसार उभा झाला की बाहेरच्या बाजूला दोन बुरूज केले जात. त्यामध्ये चिपाडाची काडी घालून वेस बनविण्यात येत असे. गावाच्या वेशीवर तुतारी वाजविणारा शिंगाडा दाखविण्यात येई. जणू येणाऱया जाणाऱयांचे तो शिंग वाजवून स्वागतच करीत आहे. त्यासाठी काचेची अर्धी बांगडी शिंग म्हणून त्या शेणाच्या बाहुलीत खुपसली जाते. वेशीजवळच दीपपाळ केली जाते. दीपमाळेवर पणत्या ठेवल्या जातात. स्त्रीजीवनातल्या साऱया दैनंदिन घडामोडींचं सुंदर, सुबक दर्शन या गवळणींमधून होतं आहे.

Web Title: The tradition of ‘gawlani’ from dung for five days in the courtyard on Diwali is still going on in the rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.