आमदाराचा वारस आमदार न होण्याची परंपरा अखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:23 AM2021-05-06T04:23:24+5:302021-05-06T04:23:24+5:30

पंढरपूर तालुक्यात देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास ७४ वर्षांच्या इतिहासात येथील नागरिकांनी आठ लोकप्रतिनिधींना विधानसभेत पाठविले. त्यानंतरच्या कालावधीत ते हयात ...

The tradition of not having MLA's successor as MLA is intact | आमदाराचा वारस आमदार न होण्याची परंपरा अखंडित

आमदाराचा वारस आमदार न होण्याची परंपरा अखंडित

Next

पंढरपूर तालुक्यात देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास ७४ वर्षांच्या इतिहासात येथील नागरिकांनी आठ लोकप्रतिनिधींना विधानसभेत पाठविले. त्यानंतरच्या कालावधीत ते हयात असताना किंवा त्यांच्या निधनानंतर काही पक्षांनी त्यांच्या वारसांना तिकिटे दिली नाहीत तर काहींना तिकीट देऊनही त्यांना विधानसभा पंचवार्षिक व पोटनिवडणुकीत निवडून येता आले नाही. त्यामुळे त्या कालावधीत नवीन चेहऱ्यांना आमदार म्हणून निवडून देण्याची भूमिका पंढरपूरच्या जनतेने घेतली आहे.

मागील महिन्यात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक पंढरपूर तालुक्यात १९५८ नंतर तब्बल ६३ वर्षांनी लागली होती. सलग तीन टर्म विजयाची हॅट‌्ट्रिक करणारे राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पोटनिवडणूक लागली. भगीरथ भालके हे सहानुभूतीच्या लाटेवर सहज विजयी होतील व ७४ वर्षांपासून अखंडित परंपरा खंडित होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपचे समाधान आवताडे धक्कादायक विजय संपादन करत ही परंपरा अखंडित ठेवली आहे.

आता होऊन गेलेल्या माजी आमदारांपैकी भालके व परिचारक कुटुंबातीलच वारस राजकारणात तग धरून आहेत. भविष्यात ही परंपरा खंडित करण्यासाठी या दोघांमध्येच पुन्हा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. या दोघांना तरी ही परंपरा खंडित करणे शक्य होते की भविष्यात आणखी कोण नवीन चेहरा समोर येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आजपर्यंत पंढरपूरचे नेतृत्व केलेले आमदार

बाबूराव जोशी (१९४८ ते १९५२), बाळासाहेब मोरे (१९५२ ते १९५७), रघुनाथ नामदेव ऊर्फ भाई राऊळ (१९५७ ते १९५८), नारायण पटवर्धन (१९५८ ते १९६२), औदुंबर पाटील (१९६२ ते १९८०), पांडुरंग ऊर्फ तात्यासाहेब डिंगरे (१९८० ते १९८५), सुधाकरपंत परिचारक (१९८५ ते २००९), भारत भालके (२००९ ते २०२०). विशेष म्हणजे यापूर्वी मागील ७४ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत निवडून गेलेले हे आठही आमदार आज हयात नाहीत.

परिचारक, पाटील यांच्यानंतर भालकेंचा सर्वाधिक काळ गाजला

पंढरपूरच्या इतिहासात आजपर्यंत तब्बल आठ लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असले तरी १९६२ ते १९८० पर्यंत सलग चारवेळा पंढरपूरचे आमदार म्हणून कै. औदुंबर पाटील यांनी आपला कार्यकाळ गाजविला. त्यानंतर त्यांच्यासोबत काम केलेले स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी एका पराभवानंतर १९८५ ते २००९ असा सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी होत आपला कार्यकाळ गाजविला. मात्र २००९ साली पक्षातील अंतर्गत धुसफूस थांबविण्यासाठी त्यांनी स्वत:हून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी जागा सोडली. त्यावेळी त्यांचा धक्कादायक पराभव करून राज्यभर जायंट किलर ठरलेले भारत भालके यांनी २००९ ते २०१९ अशा सलग तीन टर्म स्व. सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांत परिचारक यांचा पराभव करून आपला कार्यकाळ गाजविला. मात्र त्यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक झाली आणि त्यांच्या पुत्रालाही पराभवाचा सामना करावा लागला.

------

यांना जनतेतून निवडून येता आले नाही

औंदुबरअण्णा पाटील यांच्या कुटुंबातून त्यांचे पूत्र राजाभाऊ पाटील यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली. सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी २०१४ साली निवडणुक लढवली व आता आ. भारत भालके यांचे पूत्र यांनी पोटनिवडणूक लढवली मात्र या तिघांनाही जनतेतून निवडून येता आले नाही.

Web Title: The tradition of not having MLA's successor as MLA is intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.