रुढी, परंपरेमागे एक विज्ञान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:51 PM2020-01-16T12:51:54+5:302020-01-16T12:52:18+5:30

भारतीय संस्कृतीत सणांंना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Tradition, a science behind tradition ...! | रुढी, परंपरेमागे एक विज्ञान...!

रुढी, परंपरेमागे एक विज्ञान...!

googlenewsNext

भारतीय संस्कृतीत सणांंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीय सण एक अनमोल ठेवा आहे. प्रत्येक सणात असलेल्या रुढी, परंपरेमागे एक विज्ञान आहे. प्रत्येक सणामध्ये विविधता आहे. सणाच्या आहारामागे देखील आहार विज्ञान आहे. प्रत्येक सणाच्या संस्कृतीमध्ये एक उद्देश आहे आणि प्रत्येक सणांच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे जो भारतीय संस्कृतीच्या परंपरेतील विविधतेतील एकता अबाधित राखण्याचे काम करतो. चला तर मग आपण जाणून घेऊया प्रत्येक सणातील रुढी, परंपरा, आहारामागील विज्ञान  या लेखमालेच्या माध्यमातून. सर्वप्रथम नूतन वर्षाच्या प्रारंभी येणाºया मकर संक्रांत या सणाविषयी जाणून घेऊया.

मकर संक्रमण म्हणजे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश यालाच आपण मकर संक्रांत म्हणतो. भारत देश उत्तर गोलार्धात वसलेला आहे. मकर संक्रांतीच्या अगोदर सूर्य दक्षिण गोलार्धात असतो अर्थात भारतापासून अपेक्षेपेक्षाही जास्त दूर असतो. त्यामुळे आपल्याकडे रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो आणि थंडी असते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धात येण्यास सुरुवात होते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होण्यास सुरुवात होते आणि थंडी कमी होण्यास सुरुवात होते. दिवस मोठा असल्याने प्रकाशाचे प्रमाण वाढते आणि रात्र छोटी असल्याने अंधाराचे प्रमाण कमी होते. सूर्याच्या मकर संक्रमणामुळे अंधकार  प्रकाशाकडे परावर्तित होत जाण्याची सुरुवात होते. सूर्यप्रकाश वाढल्याने प्राण्यातील आणि वनस्पतीतील चैतन्य आणि कार्यक्षमता वाढीस लागते. त्यामुळे संपूर्ण भारतात विविध रूपाने, मार्गाने सूर्याची उपासना, पूजा करून सूर्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

संक्रांतीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. भारताच्या विविध राज्यात संक्रांतीला वेगवेगळी नावे आहेत. उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये संक्रांतीला  ‘खिचडी’ म्हणतात तर तामिळनाडूला ‘ताई पोंगल’, आसाममध्ये ‘भोगाली बिहु’ अशी विविध नावे आहेत. भारतातच नव्हे तर बांगलादेश,नेपाळ, थायलँड, लाओस, म्यानमार, कंबोडिया,श्रीलंका या देशात देखील संक्रांतीचा सण साजरा केला जातो.

संक्रांतीचा कुलाचार तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी, दुसºया दिवशी संक्रांत आणि तिसºया दिवशी किंक्रांंत असते,परंतु संक्रांतीचा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करतात. संक्रांतीच्या सणाला तीळगूळ दिला जातो. पौष महिन्यात संक्रांतीचा सण येतो त्यावेळी थंडी असते,थंडीमुळे त्वचा कोरडी, शुष्क पडते आणि तीळ हे स्निग्ध असते आणि गूळ हे उष्ण लोहयुक्त असल्याने तीळगूळ हे पोषक आहे. भोगीच्या दिवशी सुगडामध्ये ओले हरभरे,उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोरे, हलवा भरून हळद-कुंकू लावून दोरे गुंडाळून पूजा करतात. आपली कृषीप्रधान संस्कृती असल्याने या महिन्यात शेतात जे पिकते त्याचा सन्मान करण्याची ही परंपरा गौरवास्पद आहे. पूर्वी गावे स्वयंपूर्ण होती, गावात बारा बलुतेदारी होती, बारा बलुतेदारा पैकी कुंभाराकडील सुगडाचे पूजन केले जाते, बायका वानवशाला याच सुगडाचा वापर करतात. महाराष्ट्रात संक्रांतीच्या जेवणात सर्व पालेभाज्या आणि कडधान्ये घालून भाजी करण्याचा प्रघात आहे.या माध्यमातून भाज्या आणि कडधान्ये आहारात असणे किती गरजेचे आहे हे ठसवले जाते .

भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत असा बेत असतो. पौष महिन्यातील थंडीमुळे उष्ण बाजरी आणि स्निग्ध लोणी खाण्यात यावे हा त्यामागील हेतू आहे. तसेच संक्रांतीच्या सणाला देशभरात खिचडी केली जाते. मुगाची, उडदाची डाळ, सर्व भाज्या घालून ही खिचडी केली जाते.

सणाच्या दिवशी गुळपोळी किंवा शेंगाची पोळी म्हणजे शेंगदाण्याचे कुट, गूळ,जायफळ, वेलदोड्याचे सारण भरून पोळी केली जाते. ही पोळी अनेक दिवस टिकते, ती जशी जशी शिळी होत जाईल तसतशी गुळाची गोडी त्यात उतरते आणि शेंगाची पोळी गोड लागते. गूळ, शेंगा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढत जाते. तीळगूळ किंवा हलवा देण्यामागे देखील हेच कारण आहे. 
- वसुंधरा शर्मा
(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

Web Title: Tradition, a science behind tradition ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.