तुंगतमध्ये पाऊणतास वाहतूक रोखली; दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर
By काशिनाथ वाघमारे | Published: July 29, 2023 06:24 PM2023-07-29T18:24:18+5:302023-07-29T18:25:38+5:30
आंदोलकांनी लक्ष वेधले : वाहनांची रांग दोन किलोमीटर लागली
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर तुंगत येथे शनिवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास पाऊणतास हे आंदोलन चालले आणि या वेळेत जड वाहनांची रांग ही दोन किलोमीटरपर्यंत ठप्प झाली.
दहा दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक अध्यादेश काढला. अध्यादेशामध्ये गाईच्या दुधाला ३४ रुपये दर जाहीर केला. या निर्णयामुळे बरेच शेतकरी खूश झाले. तीन महिन्यांपूर्वी दुधाचे दर ३२ रुपयांपेक्षा खाली आले होते. राज्यभर आंदोलने झाली. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अध्यादेश काढला. परंतु त्या अध्यादेश काढताना दुधाच्या दरपत्रकाचा उल्लेख केला नसल्यामुळे दूध संघचालकांचा मनमानी कारभार सुरू झाला. शेतकऱ्याची फसवणूक असल्याचा आरोप सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी यावेळी केला.
जिल्हा दुग्धविकास अधिकारी व्ही. डी. पाटील, नायब तहसीलदार पंडित कोळी आणि पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, पप्पू पाटील, नवनाथ रणदिवे, कमलाकर देशमुख, सचिन आटकळे, शहाजान शेख, मदन जाधव, बापूसाहेब वाघमोडे, शिवाजी सांवत, नानासाहेब चव्हाण, विश्रांती भुसनर, विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे, राम नागणे, औदुंबर गायकवाड, बाहुबली सावळे, नामदेव कोरके दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.