धनगर आरक्षणासाठी तिरडी मोर्चा, रास्ता रोकोमुळे वाहतूक खोळंबली
By दिपक दुपारगुडे | Published: September 27, 2023 06:59 PM2023-09-27T18:59:18+5:302023-09-27T18:59:30+5:30
रास्ता रोकोमुळे वाहतूक खोळंबली होती.
सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवगार्तून (एसटी)चे आरक्षण द्यावं, या मागणीसाठी घेरडी (ता. सांगोला) येथील धनगर समाजाच्या वतीने अहिल्या चौक येथून गोल्डन चौकासह गावातून भंडाऱ्याची उधळण करीत सरकारच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढून मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोकोमुळे वाहतूक खोळंबली होती.
यावेळी धनगर समाजबांधवांच्या वतीने मंडलाधिकारी विजयकुमार जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांना निवेदन दिले. आंदोलनप्रसंगी रामचंद्र घुटुकडे, प्रा. आर. वाय. घुटुकडे, हरिभाऊ पाटील, कृष्णा बुरुंगले, दिलीप मोटे, यशवंत पुकळे, आबा मोटे, बयाजी लवटे, पांडुरंग घुटुकडे, अक्षय रूपनर, कयूम आतार, आप्पासो सरगर, परमेश्वर गेजगे, शशिकांत कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी हरिभाऊ पाटील म्हणाले, धनगर समाज मागील ७५ वर्षांपासून राज्यघटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. अनेकदा अंदोलनेही झालेली आहेत. प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून जाहीर भूमिका घेतात. मात्र, आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात काहीच कृती होत नसल्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारला ठोस निर्णय घ्यावाच लागेल अन्यथा धनगर समाज शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.