वाहतूक पोलिसांकडून अक्कलकोटमधील भाविकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 03:12 PM2018-08-07T15:12:20+5:302018-08-07T15:14:07+5:30
अक्कलकोटमधील प्रकार: अवैध वाहतुकीला मात्र अभय
शिवानंद फुलारी
अक्कलकोट : वाहनांची कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणाºया स्वामीभक्तांना नाहक त्रास देऊन आर्थिक लूट करीत आहेत. वाहतुकीला शिस्त लागावी, अवैध वाहतुकीवर नियंत्रण, शिस्त लावणे हे काम महत्त्वाचे असताना मात्र भाविकांकडून पैसे उकळण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वाहन व कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली संपूर्ण जिल्ह्यात पथक कार्यरत आहे. सोमवारी वाहतूक शाखेचे सहायक फौजदार लायनर, पो. हे. कॉ. कोळी, पो. हे. कॉ. माळी या तिघांनी अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत थांबून अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी स्वामीभक्तांच्या गाड्या अडविल्या.
धाकधपटशा दाखवत त्यांच्याकडून पाचशे ते हजार रुपये उकळले. पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी चपळगाव, शिरवळ, वागदरी, सलगर, मैंदर्गी, दुधनी, तोळणूर, नागणसूर, तडवळ, करजगी या भागातून रोज ४०० ते ५०० जीप, टमटम, टेम्पो अशा प्रकारच्या वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असते. त्यांना मात्र मंथली घेऊन अभय देण्यात येत असून अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूरच्या भक्तांना मात्र नाहक त्रास देण्यात येत आहे.
अवैध वाहतूकदारांकडून मंथली वसुलीसाठी एक-दोन झीरो पोलिसांची नियुक्तीही करण्यात आली आहे. यामुळे अवैधवाले सध्या तुपाशी आणि भाविक मात्र उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार रोखण्यासाठी स्वामी समर्थ पोलीस अधिकाºयांना सद्बुद्धी देईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मांस वाहतुकीचे काय?
- अक्कलकोट मार्गावरून मैंदर्गी, आळंद, कलबुर्गी, मंगरूळ या ठिकाणावरून मांस वाहतुकीचे शेकडो टेम्पो दर आठवड्यातून जात असतात. मात्र यावर मंथलीपोटी कारवाई करण्यास स्थानिकासह जिल्हा वाहतूक पोलीस कुचराई करीत आहेत. याबरोबरच रोज कर्नाटकातून जडवाहतुकीच्या २०० ते ३०० वाहनांची वर्दळ असतानाही कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
सोलापूर,अक्कलकोट, गाणगापूर या मार्गावरून रोज हजारो स्वामीभक्तांची वर्दळ आहे. भाविकांच्या गाड्यांना अडवून कागदपत्रांची मागणी करतात. त्या नावाखाली पैशाची मागणी होत असते. या प्रकाराला भाविक कंटाळले असून यावर नूतन पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी.
-शशिकांत कुंभार,
स्थानिक रहिवासी, अक्कलकोट