मांज्यात अडकलेल्या कावळ्याच्या सुटकेसाठी थांबविली सोलापुरातील रहदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:25 PM2020-11-27T16:25:01+5:302020-11-27T16:25:20+5:30
कोंतम चौक ; तिच्या जखमी पंखांत बळ येण्यासाठी युवकांनी केले ‘काकस्पर्श’
सोलापूर : अत्यंत रहदारी असलेला शहरातील कोंतम चौक मंगळवार बाजार परिसर. येथील भररस्त्यावरील एका झाडावर अगदी उंच ठिकाणी फांद्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून मांज्यात अडकलेला कावळा. पंखांची फडफड करीत स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडत होता. तिची केविलवाणी परिस्थिती पाहून धाकटा राजवाडा येथील युवकांनी रहदारी थांबवून प्रयत्नांची शिकस्त करीत तिची संकटातून सुटका केली.
कोंतम चौक येथील मंगळवार बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध आलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या कावळ्याचा आवाज रहदारीच्या वर्दळीत कोणाला ऐकूच येत नव्हता. दोन दिवसांनी येथील धाकट्या राजवाड्यात राहणाऱ्या प्रीतेश जगताप यांच्या ते लक्षात आले. पस्तीस फुटावर मांज्यात एक पंख अडकलेल्या अवस्थेत हा कावळा उलटा लटकत होता. तो जोरात हिसके देऊन सुटका करण्यासाठी प्रयत्न करत होता. मांज्याचा फास पंखाभोवती आवळत गेल्याने त्यातून रक्त खाली पडताना पाहून येथील युवकांना गहिवरून आले. कसल्याही प्रकारे तिची सुटका करण्याचा निश्चय करून येथील युवक उमेश कांबळे, प्रीतेश जगताप, प्रभाकर पाचपेंडे, सोनू कांबळे, लखन तळभंडारे, विशाल कांबळे कामाला लागले.
३२ फुटी बांबू त्याला चार-पाच फूट तारेचा आकडा बांधण्यात आला. रस्त्यावर मध्यभागी टेम्पो थांबवून त्यावर उभे राहून बांबूच्या साह्याने त्याच्या सुटकेसाठी त्यांची धडपड चालू होती. रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली. पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले. कावळ्याची सुटका झाली; पण एक पंख पूर्णतः निकामी झाल्याने उडण्याच्या प्रयत्नात जवळच्याच लहान झाडावर पडला. त्यानंतर प्रीतेश यांनी पुढाकार घेऊन प्रथमोपचार केल्यावर मात्र त्याने अडखळत का होईना, एका पंखाने आकाशात भरारी घेतली.