सोलापूर पोलीसांचा संतापजनक प्रकार; नो-पार्किंगमधील वाहनाबरोबरच छोट्या मुलीलाही घातले क्रेनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:30 PM2018-06-27T14:30:36+5:302018-06-27T14:33:00+5:30
सोलापूर शहर वाहतूक शाखेची कमाल : सोशल मीडियावर फोटो व्हायरल; नागरिकांतून संताप, शनिवारी मोर्चा
सोलापूर: वाहतुकीचे नियमन व्यवस्थित व्हावे, या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चक्क नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनासह दंड भरण्यासाठी पालकासह चिमुकल्या शाळकरी मुलीला क्रेनद्वारे वाहने उचलणाºया गाडीतून नेले. शासकीय रुग्णालयाच्या आवारातील लक्ष्मी मंदिरासमोरुन सकाळी ११.३० च्या दरम्यान ही अफलातून कारवाई करण्यात आली. यासंबंधीचे फोटो सोशल मीडियाद्वारे व्हायरल होताच नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
झाल्या प्रकाराची माहिती अशी की, अंबादास मेरगू हे आपल्या दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना वाटेत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील लक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी थांबले. दर्शन आटोपून वाहनाजवळ येत असतानाच त्यांनी नो पार्किंगमध्ये पार्क केलेली गाडी उचलण्यासाठी वाहतूक शाखेची क्रेन व्हॅन (एम. एच. २५ पी ७४७५) आली. क्रेनवरील झिरो कर्मचाºयांनी मेरगू यांच्यासह अनेकांच्या गाड्या उचलल्या. मेरगू यांनी वाहतूक शाखेचे पोलीस आणि कर्मचाºयांना संबंधित गाडी आपली असल्याचे सांगून मुलीला शाळेत सोडायचे आहे म्हणून गाडी देण्याची विनंती केली. दंडाच्या रकमेची मागणी केली याबद्दल असमर्थता दर्शविल्यानंतर मेरगू व त्यांच्या गणवेशासह शाळेत निघालेल्या मुलीला क्रेन वाहतूक करणाºया वाहनावर बसवून वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेले. तेथे त्यांच्याकडून २५० रुपये दंड वसूल केला.
अनेक पोलीस कर्मचारी इमानेइतबारे नोकरी करीत असताना काही मंडळींच्या मुजोरगिरीमुळे वादविवादाचे प्रसंग घडतात. सौजन्याने हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात, तसे न होण्यामुळेच प्रकार घडल्याचे दिसून आले.
‘प्रहार’चा शनिवारी मोर्चा
- - संबंधित प्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र फिरला आणि त्याची कर्णोपकर्णी चर्चा होऊन नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकाराची प्रहार संघटनेने दखल घेत या घटनेबरोबरच वाहतूक शाखेच्या कारभाराबद्दल दि.३० जून २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता सातरस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरुन मोर्चा काढण्याचे निवेदन दिले आहे.
झीरो कर्मचाºयांची मुजोरगिरी
- - वाहतूक शाखेमार्फत नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी खासगी वाहतुकीमार्फत क्रेनद्वारे वाहने उचलली जातात. हे करीत असताना वाहन उचलणारी मंडळी मुजोरगिरी करतात. जागेवर पावतीही दिली जात नाही. उद्दाम भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
दोषी आढळल्यास कारवाई
- वाहतूक शाखेमार्फत सिव्हिल हॉस्पिटल आवारातून नो पार्किंग झोनमध्ये ठेवलेल्या वाहनांवर केलेल्या कारवाईसंदर्भात पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
...तर प्रकार घडला नसता
- - सिव्हिलमध्ये नो पार्किंगमध्ये जे वाहन उचलले ते नियमाला धरुन असलेतरी संबंधित मुलीचे पालक मुलीला शाळेत सोडण्यासाठी उशीर होत असल्याची विनंती करीत असतानाही काहीएक न ऐकता वाहनासह चालक आणि मुलीला क्रेन वाहनातून कार्यालयात नेण्यात आले. संबंधित वाहनाचा क्रमांक घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असती तरी या प्रकाराची अधिक चर्चा झाली नसती, अशाही प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या.