रेल्वेतून चुकून आलेल्या मुलाचा सोलापुरात झाला उद्धार ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:56 PM2019-08-05T14:56:43+5:302019-08-05T15:00:11+5:30

तामिळनाडूचे वर्धराज झाले पक्के सोलापूरकर; सोशल शाळेत नोकरी मिळाली..निवृत्तही झाले

Train boy rescued in Solapur | रेल्वेतून चुकून आलेल्या मुलाचा सोलापुरात झाला उद्धार ! 

रेल्वेतून चुकून आलेल्या मुलाचा सोलापुरात झाला उद्धार ! 

Next
ठळक मुद्देवर्धराज हे पाच वर्षांचे असताना तामिळनाडूतून सोलापुरात रेल्वेने चुकून आलेसुमारे ४० वर्षे सोशल शाळेमध्ये वर्धराज यांनी काम केलेअनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही कोसळल्या

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : लहान असताना चुकून रेल्वेत बसून तामिळनाडूतून सोलापुरात आलेला मुलगा सोलापूरकर होऊन गेला. इथेच काम करत निवृत्तही झाला. त्यांचे कुटुंबही आता येथेच राहते. या शहराने त्यांना नाव, काम, कुटुंब दिले. मराठी भाषा येत नसतानाही सोलापूरने त्यांना आपलेसे केले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी त्यांची कथा आहे.

वर्धराज हे पाच वर्षांचे असताना तामिळनाडूतून सोलापुरात रेल्वेने चुकून आले. स्टेशनवर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बालगृहात ठेवले. १९६४ ते १९६९ पर्यंत ते तिथेच राहिले. त्यानंतर सलगर वस्ती येथील शासकीय शाळेमध्ये ते शिकत होते. एकेदिवशी रस्त्यावरून जात असताना वर्धराज यांचा अपघात झाला. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर सुमारे एक वर्ष शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. डॉ. विनायक चितळे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. पुढे डॉ. विनायक चितळे यांनी त्यांना आपल्या रुग्णालयात कामाला घेतले.

काही वर्षांनंतर सोशल संस्थेचे डॉ. महमदअली वडवान हे उपचारासाठी डॉ. चितळे यांच्या रुग्णालयात गेले होते. तिथे वर्धराज यांनी डॉ. वडवान यांची सेवा केली. डॉ. वडवान यांना वर्धराजचा स्वभाव आवडला. त्यांनी वर्धराज याला आपल्या सोशल संस्थेत शिपाई पदावर कामावर घेण्याविषयी डॉ. चितळे यांना विचारले. डॉ. चितळे यांनीही त्यांना होकार दिला. तसेच वर्धराजही सोशल शाळेमध्ये काम करण्यास तयार झाले. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून वर्धराज यांना शाळेत रुजू करून घेतले. सुमारे ४० वर्षे सोशल शाळेमध्ये वर्धराज यांनी काम केले. ३१ जुलै रोजी ते निवृत्त झाले. यानिमित्त शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही कोसळल्या
वर्धराज यांना सांभाळण्यासाठी अनेक जण पुढे आले. वर्धराज यांचा धर्म व जात कुठली होती हे न पाहता हिंदू, मुस्लीम तसेच ख्रिश्चन धर्मातील लोकांनी वर्धराज यांना शिकविले, कामाला लावले, त्यांचे लग्नही लावून दिले. एका अनोळखी व्यक्तीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही गळून पडल्या. बालगृहात असताना वळसंगकर बाई यांनी मराठी शिकवले, सलगर वस्ती येथील शाळेतील शिक्षक सुरेंद्र गायकवाड यांनी त्यांना आपल्या घरी सांभाळले, डॉ. विनायक चितळे यांनी उपचार करून वर्धराज यांना आपल्याच रुग्णालयात कामाला घेतले, डॉ. वडवान यांनी आपल्या शाळेत नोकरी लावली, ख्रिश्चन असणाºया कुसुम केतनी वर्धराज यांचे लग्न लावून दिले. लग्न लावण्यासाठी सिद्राम बंडगर, आखाडे सिस्टर यांनीही मदत केली.

काही वर्षांपूर्वी तामिळनाडूमधील सेलम या जिल्ह्यातील माझ्या गावात गेलो होतो. तिथे माझी फक्त एक मावस बहीण आहे. इतर सर्व नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूूमध्ये आडनाव नसते. येथे मला स्वामी हे आडनाव बालगृहानेच दिले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत खूप जणांचा वाटा आहे. सोलापूरकरांनी जाती-धर्म विसरून मला मदत केली. मी सध्या होटगी रोड येथील भारतमाता नगरमध्ये राहतो. या शहराने मला सर्व काही दिल्याने आयुष्यभर या शहराचा ऋणी आहे.
 - वर्धराज स्वामी

Web Title: Train boy rescued in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.