जमीन संपादित केली...शेतातून रेल्वे गेली.. फाटक्या खिशानिशी पाहिली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:21 PM2020-09-24T12:21:54+5:302020-09-24T12:24:22+5:30
मोबदल्यासाठी रामहिंगणीतील शेतकºयाची व्यथा: दुहेरीकरण-कॅनॉलसाठी १४ वर्षांपूर्वी संपादन; दोन आॅक्टोबरला गांधीगिरी
वडवळ : रेल्वे दुहेरीकरण अन् कॅनॉलसाठी जमीन संपादित केली. वर्षामागून वर्षे लोटली. आता हे १४ वे वर्ष आहे; अद्याप मोबदला मिळाला नाही. वर्षानुवर्षे शासनदरबारी हेलपाटे मारुनही हाती काहीच लागले नाही.
आता ही व्यथा आहे रामहिंगणीचे बाधित शेतकरी पांडुरंग चौगुले यांची़ पांडुरंग केराप्पा चौगुले यांची गट नंबर २२ ही जमीन रामहिंगणी रेल्वे लाईनच्या जवळ आहे. सन १९९० मध्ये त्यांची भीमा पाटबंधारे खात्याने कॅनॉलसाठी जमीन संपादित केली़ तशा नोटिसा पांडुरंग चौगुले यांना देण्यात आल्या. मोबदला न दिल्याने २००६ मध्ये पांडुरंग चौगुले यांनी भूसंपादन या खात्याकडे अर्ज केला. २०१६ साली तीन वेळा निवेदन दिले़ तेव्हा जमिनीचा गट गेल्याची नोंद नसल्यामुळे मोबदला देता येत नाही असे तोंडी सांगितले. त्यानंतर २००३- २००४ मध्ये पांडुरंग चौगुले यांची जमीन सोलापूर मध्य रेल्वेने दुहेरी रेल्वे करण्यासाठी संपादित केली.
त्यावेळीही आजूबाजूच्या सर्व शेतकºयांना मोबदला मिळाला; मात्र चौगुलेंना वगळले. अर्ज, विनंत्या केल्या; मात्र रेल्वेने देखील तुमचा गट आम्ही आरक्षित केलेल्या जमिनीमध्ये भूसंपादन अधिकाºयांनी दाखवला नाही, त्यामुळे मोबदला देता येत नाही असे सांगितले. भूमी अभिलेख कार्यालयातून कागदपत्रे काढली असता त्यामध्ये रेल्वेसाठी आणि कॅनॉलसाठी जमीन आरक्षित केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, डीआरएम सोलापूर यांच्याकडेही लेखी पाठपुरावा केला़
जनहित देणार न्याय
रामहिंगणीचे शेतकरी पांडुरंग चौगुले यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून न्याय मिळवून देणारच, असे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले
माझ्या शेताच्या खालच्या आणि वरच्या भागातील शेतकºयांना लाभ मिळतो आणि फक्त मलाच कसे वगळले जाते? २००५ पासून मी अर्ज, विनंत्या करतोय. दखल कोणीच घेत नाही. त्यामुळे लालफितीच्या कारभाराला वैतागून मी कुटुंबासह बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारत आहे.
-पांडुरंग चौगुले,
शेतकरी, रामहिंगणी