युजर चार्जेसमुळे १० ते ३० रुपयांनी महागणार रेल्वे तिकीट
By Appasaheb.patil | Published: October 1, 2020 12:55 PM2020-10-01T12:55:55+5:302020-10-01T12:58:26+5:30
केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव; नोव्हेंबरपासून राज्यातील १० रेल्वे स्थानकांवर होणार वसूल
सुजल पाटील
सोलापूर : रेल्वे स्थानकावर करण्यात येणाºया पुनर्विकास योजनेतील कामासाठी आता रेल्वे प्रवाशांकडून युजर चार्जेस वसूल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे़ नोव्हेंबरपासून राज्यातील १० रेल्वे स्थानकांवरून युजर चार्जेस वसूल करण्यात येणार आहेत़ त्याचा दर साधारण १० ते ३० रुपयांपर्यंत असणार आहे़ रेल्वेने त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला असून मंजुरीनंतरच युजर चार्जेस वसुलीला सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
रेल्वे स्थानकावर विविध विकास कामे करणे अथवा प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे मंत्रालय पुनर्विकास योजना राबवित आहे़ ही योजना आता खासगी कंपन्यांकडून चालविण्यात येणार आहे़ त्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने हा निधी जमा करण्यासाठी रेल्वे आता रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांसोबतच त्यांना सोडण्यासाठी आलेल्या व स्थानकावरून घेऊन जाण्यासाठी आलेल्या लोकांकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून युजर चार्जेस वसूल करण्यात येणार आहे़ या चार्जेसमधून जमा झालेल्या पैशांतून रेल्वे स्थानक, हॉटेल, मॉल्स, कार्यालयीन जागा, फूड प्लाझा, रेस्टॉरंट, रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
राज्यातील या रेल्वे स्थानकांचा असेल समावेश
प्रायोगिक तत्त्वावर देशातील महत्त्वाच्या ए १ श्रेणीतील स्थानकावर हा युजर चार्जेस वसूल करण्यात येणार आहे़ यात महाराष्ट्रातील सोलापूर, नागपूर, पुणे, कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनल या स्थानकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय आहे युजर चार्जेस...
भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जातो़ तसेच विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात़ त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी दिला जातो; मात्र यापुढे रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे युजर चार्जेसमधून मिळालेल्या पैशातून करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार सुरू आहे़
असा असेल दऱ...
युजर चार्जेसच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांकडून १० ते ३५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे़ एसी १ साठी ३० ते ३५ रुपये, एसी २ साठी २५ रुपये तर एसी ३ साठी २० रुपये असणार आहे़ पाहुण्यांना सोडण्यासाठी व घेऊन जाण्यासाठी आलेल्या लोकांकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून युजर चार्जेस वसूल करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले़