दिवाळीत २६ लाख प्रवाशांचा रेल्वे प्रवास; सोलापूरला मिळाले ३६ कोटींचे उत्पन्न
By appasaheb.patil | Published: November 8, 2019 01:03 PM2019-11-08T13:03:30+5:302019-11-08T13:05:14+5:30
मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग : एसटीसह खासगी बसचालकांचीही कमाई सुसाट
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांना दिवाळीत प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ १ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सोलापूर विभागातून भारताच्या कानाकोपºयात २५ लाख ८१ हजार २९२ प्रवाशांनी प्रवास केला़ यातून रेल्वेला ३५ कोटी ४३ लाख २ हजार ४१३ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणासाठी संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतून प्रवाशांनी सोलापूर विभागातून प्रवास केला.
दिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाºया प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़ दरम्यान, सोलापूर विभागामध्ये २१ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान दिवाळी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गाड्यांमध्ये प्रवासी विनातिकीट प्रवास करू नये, याकरिता विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले आहे़ या तपासणीत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ७७ रेल्वे स्थानकांवरून धावणाºया मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमधील प्रवाशांकडील तिकिटाची तपासणी केली़ या तपासणीत २८ हजार ८५९ प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून आले़ त्यांच्याकडून १ कोटी ५१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचा दंड वसूल केला.
वाढती प्रवासी संख्या, कमी प्रमाणात असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे अनेकांना रेल्वेने प्रवास करता आला नाही़ याचा फायदा खासगी बसचालकांनी घेतला़ त्यामुळे खासगी बसचालकांनी तिकीट दरात दहापट वाढ केली होती़ शिवाय महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या एसटी गाड्याही कमी प्रमाणात मार्गावर होत्या़ त्यामुळे घरी परतणाºया प्रवाशांना ऐन दिवाळी सणात चांगला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता.
आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची विशेष कामगिरी
- दिवाळी सणाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºयांची संख्या अधिक होती़ त्यामुळे सोलापूर विभागातील प्रत्येक स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती़ या गर्दीचा फायदा घेऊन चोरी अथवा अन्य अनुचित प्रकार करणाºयांवर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी करडी नजर ठेवली होती़ त्यामुळे या दिवाळीकाळात एकही चोरीची घटना सोलापूर विभागात घडली नाही़ प्रवाशांना सुरक्षित व सुखकर प्रवास घडविण्यात आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याची माहिती आरपीएफचे प्रमुख मिथुन सोनी दिली़
दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन केले होते़ विशेष गाड्या, तिकीट खिडक्यांच्या संख्येत वाढ व प्रवाशांची सुरक्षा यावर अधिक काम केले होते़ त्यामुळेच रेल्वेला ३५ कोटी ४३ लाख २ हजार ४१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले़ मागील वर्षीच्या कालावधीपेक्षा यंदाच्या उत्पन्नात चांगली वाढ आहे, असे म्हणावे लागेल.
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर
अतिरिक्त तिकीट खिडक्यांमुळे प्रवासी वाढले
- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दिवाळी सणानिमित्ताने प्रवाशांनी अतिरिक्त गर्दी केली होती. वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविल्या होत्या. या विशेष गाड्यांमुळे आरक्षण तिकीट केंद्रावर आणि अनारक्षित तिकीट कार्यालयात अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू केल्या होत्या़ त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाºयांची संख्या वाढली.