पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ४४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जाणून नेमकं कारण
By विठ्ठल खेळगी | Published: March 8, 2023 01:53 PM2023-03-08T13:53:40+5:302023-03-08T13:54:19+5:30
याच पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर २०२२ रोजी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत ठराव करून या कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस केली होती.
विठ्ठल खेळगी
सोलापूर/पंढरपूर : मागील काही वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या ४४ कर्मचाऱ्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी खात्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अनेक विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले होते. विविध विभागांमध्ये एकेक कर्मचारी वर्षानुवर्षे राहिल्यामुळे संबंधित विभागांमध्ये त्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली होती. त्यांच्याविषयी अनेक विभागांसंदर्भात भाविकांच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. अशा निष्क्रिय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी होऊ लागली होती.
याच पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर २०२२ रोजी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत ठराव करून या कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस केली होती. त्या शिफारशीला १५ फेब्रुवारीच्या समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली होती. ६ मार्च रोजी कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी एक आदेश काढून ४४ कर्मचाऱ्यांच्या विविध विभागांतर्गत बदल्या केलेल्या आहेत. १० मार्चपासून या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कामावर हजर राहावे व तसा अहवाल सादर करावा, असेही या आदेशात नमूद केलेले आहे.