चिठ्ठीद्वारे सत्तापरिवर्तन.. सासू-सुना, चुलत जावांना समान मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:52+5:302021-01-19T04:24:52+5:30
माढा तालुक्यातील निमगाव येथे चिठ्ठीद्वारे सत्तापरिवर्तन झाले असून, जयशंकर परिवाराच्या लोचना शिंदे व स्वाभिमान परिवाराच्या अविदा शिंदे ...
माढा तालुक्यातील निमगाव येथे चिठ्ठीद्वारे सत्तापरिवर्तन झाले असून, जयशंकर परिवाराच्या लोचना शिंदे व स्वाभिमान परिवाराच्या अविदा शिंदे या सासू सुनेला समान मते पडली. यामध्ये लोचना शिंदे यांची चिठ्ठी निघाली असून दोन्ही गटाच्या समान जागा व एका उमेदवाराला समान मते पडल्याने चिठ्ठीमुळे स्वाभिमानी पाटील शिंदे गटाची सत्ता संपुष्टात येणार आहे. मुकणे शिंदेे सरशी झाली आहे.
अकुलगाव येथे दत्तात्रय जगताप व आनंद पाटील यांना समान मते पडल्याने आनंद पाटील चिठ्ठीवर विजयी झाल्याने आनंद पाटील व सुनील नरोटे गटाला पाच जागा तर दत्तात्रय जगताप गटाला चार जागा मिळाल्याने या ठिकाणीदेखील चिठ्ठीवर सत्तापरिवर्तन होणार आहे. पापनस येथील मनीषा लेंगरे व निर्मला लेंगरे यांना समान मते पडली होती. यामध्ये दादा तरंगे गटाच्या मनीषा लेंगरे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्या विजयी झाल्या. तर याठिकाणी बजरंग तरंगे गटाला तीन जागा मिळाल्याने सत्तापरिवर्तन झाले. खौरेवडी येथील सुनीता व अंजना शिंगाडे या चुलत जावा यांनादेखील समान मते पडली होती यामध्ये चिठ्ठीद्वारे सुनीता शिंगडे यांना विजयी घोषित करण्यात आले. बुद्रुकवाडी येथे भोसले गटाच्या संगीता गुंड व संदीप पाटील गटाच्या विद्या पाटील यांना समान मते पडल्याने ठिकाणी यामध्ये विद्या पाटील विजयी झाल्या.
लाख-मोलाचे विजयी मत
गार अकोले येथील मतदान घेण्यात आले. यामध्ये बबनराव केचे गटाला चार जागा तर जितेंद्र गायकवाड गटाला तीन जागा मिळाल्या. एका जागेवर केचे गटाचे देवकते विजयी झाले. तर गायकवाड गटाचे देवकते एक मताने पराभूत झाले. केचे गटाचे देवकते एक मताने विजयी झाल्याने १० वर्षाची गायकवाड गटाची सत्ता एका मताने संपुष्टात आणली आहे.
सुर्ली येथून प्रियंका काळे २ प्रभागांमध्ये निवडून आले.
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत त्यांचे पूत्र ऋतुराज सावंत व झेडपी सदस्य रणजीत सिंह शिंदे यांचे मेहुणे संदीप पाटील व सभापती विक्रमसिंह शिंदे यांचे मेहुणे अभिषेक देशमुख निवडणुकीत विजयी झाले.
-----
यांचा झाला दीर भावजयींकडून पराभवमहाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूमधून, ज्योतीताई कुलकर्णी उपळाई खुर्दमधून तर मोडनिंबमधून माजी सरपंच सभापती बाबूराव सुर्वे, माजी उपसभापती नंदाताई सुर्वे या नवरा बायकोचा बालाजी पाटील व सुजाता पाटील या दीर भावजयीकडून पराभव झाला. मानेगाव गटाच्या माजी झेडपी सदस्या सुलभा धर्मे पराभूत झाल्या.
दोघे ठरले सर्वात तरुण सदस्यसुलतानपूर येथून २१ वयाचा रोहन धुमाळ व लोंढेवाडी येथून सत्यम लोंढे या दोन युवकांची सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य म्हणून नोंद होणार आहे.
माढा तालुक्यातील सत्तापरिवर्तन झालेल्या ग्रामपंचायती बुद्रुकवाडी, शिराळा (माढा), रुई, कुंभेज, तांदुळवाडी, जाधवाडी (माढा), लहू, सुर्ली, उपळवटे, निमगाव (माढा), अंजनगाव उमाटे, कव्हे, वडाचीवाडी (अ. उ.), आलेगाव बुद्रुक, टाकळी (टे.), सोलंकरवाडी, भोगेवाडी, आकुलगाव, सापटणे (टे.), उपळाई बुद्रुक, भुताष्टे, उपळाई खुर्द, लऊळ या २३ गावांत सत्तापरिवर्तन झाले.
------