सोलापूर ग्रामीणमधील ४०० पोलिसांच्या बदल्या; पारदर्शक प्रक्रियेसाठी एसपींचे वन टू वन
By Appasaheb.patil | Published: May 26, 2022 05:54 PM2022-05-26T17:54:49+5:302022-05-26T17:55:01+5:30
आस्थापना मंडळाची लगबग; विनंती अर्ज, कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळतोय दिलासा
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - एकाच पोलीस ठाण्यात पाच वर्षाची सेवा पूर्ण व विनंती अर्ज केलेल्या ४०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. पारदर्शक बदली प्रकिया पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या प्रत्येक कर्मचाऱ्याचे समक्ष मत जाणून घेत, अडचणी जाणून घेऊन रिक्त जागा व विनंती अर्जाचा विचार करून बदली प्रक्रिया राबवित आहेत. या प्रक्रियेत आस्थापना मंडळांची मोठी कसरत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत २५ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. अडीच हजाराहून अधिक पोलिसांचे संख्याबळ असलेल्या ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, सहायक पोलीस फौजदार या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर शहराची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामीणच्या बदली प्रकियेने चांगलाच वेग घेतला आहे.
-----------
घरच्या अडचणींचा विचार
बदली प्रक्रियेत सर्वाधिक कर्मचारी हे घरच्या अडचणी सांगत आहेत. शिवाय कुटुंबातील सदस्यांवर सुरू असलेले उपचार, मुला-मुलींचे शिक्षण, वैद्यकीय अडचणी, कुुटुंबाची जबाबदारी यासह अन्य अडचणी पोलीस अधीक्षकांसमोर सांगून बदली करा अशी विनंती अनेक कर्मचारी करीत आहेत. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार पोलीस अधीक्षक करीत असल्याचे एका कर्मचाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.
------------
बदलीसाठी चार पोलीस स्टेशनचा पर्याय
अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेत प्रत्येक कर्मचाऱ्यांना चार पोलीस ठाणे किंवा स्टेशनचा पर्याय देण्यात येत आहे. या पर्यायानंतर रिक्त जागा व आवश्यक असलेल्या जागांचा विचार करून कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी बदलीचे ठिकाण देण्याचे कार्य सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
-------------
अनेकांना मुख्यालयाचा रस्ता...
या अंतर्गत बदली प्रक्रियेत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तक्रारी आहेत, किंवा एखाद्या प्रकरणात त्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे, अशा कर्मचाऱ्याची मुख्यालयात बदली होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. शिवाय तपास कामात कामचुकारपणा करणाऱ्यांनाही मुख्यालयाचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
---------
आस्थापना मंडळांची पारदर्शकता...
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी आस्थापना मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचा समावेश आहे. यासह त्यांच्या मदतीसाठी अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-----------
ग्रामीण पोलीस दलातील एकूण ४०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. दोन ते तीन दिवसात प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यक्तिगत बोलावून त्याच्या अडचणी जाणून घेत आहोत. रिक्त जागा व उपलब्ध संख्या याचा विचार करून संबंधितांची बदली करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण बदली प्रक्रिया पूर्ण होईल.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण