सोलापुरातील परिवहन कर्मचाºयांचा संप कायम, पगारासोबतच आता व्यवस्थापकांना हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:04 AM2019-01-24T11:04:09+5:302019-01-24T11:04:22+5:30
सोलापूर : दोन महिन्यांचा थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनी मंगळवारपासून सुरू केलेला संप दुसºया दिवशीही ...
सोलापूर : दोन महिन्यांचा थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनी मंगळवारपासून सुरू केलेला संप दुसºया दिवशीही कायम होता. कर्मचाºयांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा संप झाल्याचा दावा परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी केला आहे. ६० हून अधिक कर्मचाºयांनी मल्लाव यांना हटविण्याची मागणी केली आहे.
परिवहन कर्मचाºयांना दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यांनी पुकारलेल्या संपामुळे सात रस्ता आणि राजेंद्र चौक येथील डेपोमध्ये बस थांबून आहेत. ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अंध, अपंग आणि मूकबधिर यांच्या मोफत प्रवास पासचे ८३ लाख रुपयांचे बिल दिल्यास कर्मचाºयांचे वेतन करता येईल, असे परिवहन व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के आणि सदस्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली होती. परंतु, आयुक्तांनी आर्थिक अडचणीमुळे हे बिल देता येणार नाही, असे सांगितले आहे.
व्यवस्थापनाकडून दिशाभूल, कामगारांचा आरोप
- परिवहन उपक्रमाचे देविदास गायकवाड, आर. एम. मकानदार, दस्तगीर कोरके, नागेश म्हेत्रे, सुधाकर मारडकर, एम. एस. कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ६२ कामगारांच्या सह्या असलेले एक निवेदन जारी केले. यात म्हटले आहे की, परिवहन कर्मचाºयांच्या वेतनाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, सर्व कामगारांना महापालिकेत वर्ग करावे. जुलै २०१७ ते जुलै २०१८ पर्यंतचे वेतन थकले आहे. याचा पाठपुरावा करून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे. परिवहन व्यवस्थापक १० जुलै रोजी रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात एकूण भंगार विकून केवळ दोन वेळा वेतन दिले. व्यवस्थापक अशोक मल्लाव सक्षम नाहीत. ते कामगार आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत. महापालिकेचे आरोग्य खाते, उद्यान, शिक्षण खात्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही. पण तरीही ते चालविले जाते. बेस्टच्या धर्तीवर सोलापूर परिवहनचे महापालिकेत विलीनीकरण करावे.
सात रस्ता पंप बंद, घंटागाड्या पोलिसांच्या पंपावर
- कर्मचाºयांनी सात रस्ता डेपोमधील डिझेल पंप बंद ठेवला आहे. त्यामुळे घंटागाड्या आणि पदाधिकाºयांच्या गाड्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या पंपावरून इंधन भरण्यास सुरुवात केली आहे. कामगारांनी हा पंप सुरू ठेवायला हवा होता. तो बंद ठेवल्यामुळे मनपा आयुक्त संतापले. कामगारांनी अत्यावश्यक सेवेला बाधा आणली, असेही मल्लाव यांनी सांगितले.
ही तर भाजपची चाल, आम्ही आंदोलनात उतरू : तुकाराम मस्के
- - परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी अर्थसंकल्पात परिवहनसाठी दरवर्षीप्रमाणे तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, ही समिती शिवसेनेला मिळाली, त्यामुळे भाजपवाल्यांनी ही तरतूदच केली नाही. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने खेळलेली ही चाल आहे.
- - महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे हे सुद्धा थकीत बिल देण्यास वेळ लावत आहेत. त्यात कामगारांचे हाल होत आहेत. परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांचे काम चांगले आहे. मल्लाव आणि आमच्या पुढाकारामुळे सध्या ४५ बस रस्त्यावरुन धावत आहेत.
- - शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांची गुरुवारी सायंकाळी ४ वा. महापालिकेत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर शिवसेना कामगारांच्या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेणार आहे.