आलिशान गाडीतून हातभट्टी दारूची वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली जप्त
By संताजी शिंदे | Published: March 8, 2024 07:49 PM2024-03-08T19:49:30+5:302024-03-08T19:49:43+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हातभट्टी दारू प्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हातभट्टी दारू प्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान एका आलीशान गाडीतून जाणारी दारूही जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्प विभागाने गुरूवार व शुक्रवार या दोन दिवसात मोहिम राबविण्यात आली. सोलापूर-तुळजापूर रोडवर एका अलिशान गाडीतून बाराशे लिटर तर जिल्हाभरात हातभट्टी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर रोडवरील गंगेवाडी (ता. उत्तर सोलापूर) परिसरात बोलेरो जीप (क्र. एमएच-१२ जीके-४४२७) आडवून तपासणी केली. त्यात १० रबरी ट्यूबमध्ये अंदाजे बाराशे लिटर हातभट्टी दारू आढळून आली. या प्रकरणी समर्थ मोहन पवार(वय-२४) कोंडीबा शिवाजी राठोड (वय ४७) या दोघांना अटक केली. कारवाईत जीपसह सहा लाख ६१ हजार रूपये किंमतीचा माल जप्त केला.
दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड (वय-२४ रा. मुळेगाव तांडा) हा इसम त्याच्या दुचाकी वाहन (क्र. एमएच-१३ डीएच-४३१३) वरून दोन रबरी ट्यूब मध्ये १६० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडुन ६८ हजार २०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने मोटारासयकल (क्र. एमएच-१३ डीएन-९३६८) वरून १६० लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. या कारवाईत एक इसम वाहन जागीच सोडून फरार झाला. सांगोला दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील मंगळवेढा- मरवडे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायबण्णा सिद्धाराम पाटील (वय-२६) त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडर (क्र.एमएच-१० सीएच- ८३८८) विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून ६६ हजार ५७० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. असे जिल्ह्यात एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले. हि विशेष मोहित राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.