क्रश मशीनमध्ये रिकाम्या बाटल्या टाकल्यास प्रवाशांना मिळणार सवलतीचे कूपन !
By appasaheb.patil | Published: September 17, 2019 12:47 PM2019-09-17T12:47:42+5:302019-09-17T12:49:39+5:30
सोलापूर विभागातील ७९ रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त होणार; चौदा ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित
सोलापूर : सध्या जगापुढे प्लास्टिक मुक्तीचे मोठे आव्हान आहे. ते संपविण्यासाठी अनेकांनी विविध शकली लढविल्या. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिकचे योग्य पद्धतीने विघटन करण्यासाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात १४ ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे़, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
रेल्वे स्थानकावर उभा करण्यात आलेल्या प्लास्टिक बॉटल क्रश मशिन्समध्ये बॉटल टाकल्यानंतर प्रवाशाला आपला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर प्रवाशाला धन्यवादचा संदेश प्राप्त होईल, संदेश प्राप्त होताच ५ रुपये सवलतीचे कूपन मिळणार आहे़ या कूपनव्दारे प्रवासी रेल्वे स्थानकावरील कोणत्याही स्टॉल अथवा दुकानात जी वस्तू विकत घेईल त्यावर ५ रुपयाची सूट मिळणार आहे.
प्रवाशांना कुपन यासाठी सोलापूर विभागाची आयआरटीसीशी बोलणी सुरू असून लवकरच सोलापूर विभागात ही कूपन सिस्टीम लवकरच सुरू होईल असा विश्वास विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सध्या हा उपक्रम मध्य रेल्वेच्या बिहार, पाटणा जंक्शन, राजेंद्रनगर, पाटणा साहिब, दानापूर स्थानकावर सुरू आहे़ लवकरच तो सोलापूर विभागात दिसेल असेही मल्होत्रा यांनी सांगितले.
सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वच्छतेच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अस्वच्छता दाखवून देण्याबाबत प्रवाशांना आवाहनही करण्यात आले आहे. स्थानकाच्या आवारात प्रवासी पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणावर घेऊन येत असतात.
बाटलीतील पाणी संपल्यानंतर स्थानकाच्या आवारात कुठेही या बाटल्या टाकून दिल्या जातात. भुयारी गटार किंवा चेंबरमध्ये या बाटल्या अडकून राहिल्यास सांडपाण्याच्या निचºयावर परिणाम होतो. पर्यावरणासही त्यामुळे हानी पोहोचते. प्लास्टिकच्या बाटल्यांचे योग्य पद्धतीने विघटन करण्यासाठी सोलापूर रेल्वेने प्लास्टिक बॉटल क्रश हे यंत्र सोलापूर विभागातील १४ ठिकाणी बसविले आहे.
या मशिन्समध्ये जमा झालेले प्लास्टिक सोलापूर महापालिकेला प्रक्रिया करण्यासाठी देत असल्याची माहिती स्थानकप्रमुख गजानन मीना यांनी दिली.
आणखीन १७ मशीन्स मागणीचा प्रस्ताव सादर
- सोलापूर विभागात ७९ रेल्वेस्थानके आहेत़ त्यापैकी १० स्थानकांवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात होते़ प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक या पद्धतीने आणखीन मशिन्सची गरज सोलापूर विभागातील स्थानकावर लागणार आहे़ सध्या १४ मशिन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत़ आणखीन १७ मशिन्स लागणार असून याबाबतचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली.
पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या किंवा कोल्ंिड्रक्सच्या बाटल्या या ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्रात टाकल्यास त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे़ प्लास्टिकमुक्तीसाठी हा उपक्रम चांगला आहे़ गर्दीच्या ठिकाणी या मशिन्स लावल्या जातील़ सध्या १४ मशिन्स कार्यान्वित करण्यात आल्या असून आणखीन १७ मशिन्ससाठीचा पाठपुरावा सुरू आहे़ लवकरच त्या दाखल होतील असा विश्वास आहे़ प्रवाशांनी स्वच्छ रेल़़़स्वच्छ भारतसाठी सहकार्य करावे.
- हितेंद्र मल्होत्रा
विभागीय व्यवस्थापक, सोलापूर मंडल