यंदाही सावता महाराजांच्या भेटीसाठी खड्ड्यातूनच प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:50 PM2019-06-25T12:50:31+5:302019-06-25T12:52:21+5:30
मोडनिंब ते अरण पालखी मार्गाचे काम अद्याप सुरू नाही; भाविकांनी व्यक्त केला संताप
मारूती वाघ
मोडनिंब : मोडनिंब ते पांडुरंग पालखी मार्गासाठी पाच कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. यंदाही सावता महाराजांच्या भेटीला खड्ड्यातून जावे लागणार की काय? असा संताप भक्तांकडून व्यक्त होत आहे.
आषाढ महिन्याच्या शेवटी संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर ते मोडनिंबहून पालखी अरणला रथातून आणली जाते. दरवर्षी पालखीबरोबर असणाºया वारकºयांना पंढरपूर-कुर्डूवाडी रस्ता सोडून पांडुरंग पालखी मार्गाने मोडनिंब शिवारातील रस्त्यास लागल्यानंतर सात कि. मी. रस्त्यावर यावे लागते. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे अशी मागणी केली होती.
समाजकल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजी कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी सोलापूर-पुणे महामार्गावर पालखी अडवून ठेवली होती. त्यावर अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिले होते. मंत्री पंकजा मुंडे, आ. बबनदादा शिंदे, सावता परिषदेचे कल्याण आखाडे यांनी पाठपुरावा केला. ‘लोकमत’नेही या रस्त्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे या रस्त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून पाच कोटी रुपये मंजूर झाले.
सावता महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण होईल असे वाटले होते; मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. दरवर्षी आषाढीच्या निमित्ताने महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून अनेक वारकरी अरणला येतात. सातत्याने वारकºयांची वर्दळ सुरू होते. अनेकांना उखडलेली खडी, खड्ड्यातून जावे लागते. पाऊस झाला तर पाण्याने खड्डे पडतात. त्यामुळे वारकºयांना त्रास होतो. यामुळे काम सुरू करण्याची मागणी होत आहे.
कामाची निविदा निघाली असून, वर्कआॅर्डर निघाली नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण होईल.
-प्रकाश महाजन
उपविभाग अधिकारी, मुख्यमंत्री सडक योजना