पाकसमवेत शत्रूराष्ट्राप्रमाणे व्यवहार करा : वर्तक
By admin | Published: October 22, 2015 09:10 PM2015-10-22T21:10:13+5:302015-10-22T21:10:13+5:30
मोदी शासनाला जनतेने मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. इस्रायलप्रमाणे भारताने आता पाकिस्तानशी कठोरपणे वागण्यास प्रारंभ करावा.
सोलापूर : मोदी शासनाला जनतेने मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. इस्रायलप्रमाणे भारताने आता पाकिस्तानशी कठोरपणे वागण्यास प्रारंभ करावा. पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र असल्याने त्यांच्यासमवेत चाणक्यनीतीनुसार शत्रूराष्ट्राप्रमाणेच व्यवहार करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात अभय वर्तक बोलत होते. ते म्हणाले, भारतापुढे इतिहासातील अफजलखानापासून मोहम्मद घोरीच्या विश्वासघाताची उदाहरणे समोर आहेत. भारतातील काही निधर्मी लोकांना पाकिस्तानविषयी विनाकारण प्रेम उफाळून येत आहे. भारतीय चित्रपट, कलाकार यांच्यावर पाकिस्तानात सातत्याने बंदी घातली जात असताना भारतातील वाहिन्यांवर पाकिस्तानी कलाकार निर्धास्तपणे वावरत आहेत. पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत होण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. भारतात सीमेवरील गोळीबार असो, जवानांचे गळे कापून हत्या असो वा आतंकवादाला साहाय्य असो, या सर्व कारवायांत सातत्याने पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आपण पाकिस्तानशी शांतता चर्चा करून, पाकिस्तानी खेळाडूंना आणि कलाकारांना भारतात मोकळीक देऊन बलिदान दिलेल्या निरपराध भारतीयांचा अपमान करत आहेत.
गेल्या ६७ वर्षांच्या अनुभवातून पाकिस्तानशी कितीही चर्चा करून, गाणी गाऊन वा क्रिकेट खेळून त्यांचे वाकडे शेपूट सरळ झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील लोकांचे कार्यक्रम ठेवणे याचा दुसरा अर्थ ते करीत असलेले सर्व गुन्हे क्षम्य आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक आर्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे शत्रूसमवेत शत्रूप्रमाणेच व्यवहार करणे अपेक्षित आहे. तसेच ज्या कौटिल्याने जगाला राजधर्म शिकवला त्यांच्याकडून आपल्या राज्यकर्त्यांनी शिकले पाहिजे, असेही यावेळी अभय वर्तक म्हणाले. (प्रतिनिधी)