हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर ‘स्टेमी’ प्रकल्पाद्वारे होणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:21 AM2020-02-07T10:21:23+5:302020-02-07T10:23:20+5:30
हृदयविकार रूग्णांना मिळणार दिलासा; उपजिल्हा रूग्णालयातही मिळणार उपचार
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यास त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे असते. मात्र, गरजेच्या वेळेस असे उपचार मिळतातच असे नाही. ग्रामीण भागात हृदयविकाराचा झटका आल्यावर उपचार न झाल्याने अधिक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून उपजिल्हा रुग्णालयात स्टेमी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याने उद्भवणाºया आजाराने अनेक जणांचा मृत्यू होतो. अशाप्रकारे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण राज्यामध्ये जास्त आहे. अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळाल्यास होणाºया मृत्यूवर प्रतिबंध घालता येणे शक्य होते. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, यात सोलापूरचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देऊन त्यांना जीवदान देण्यात यणार आहे.
स्टेमी प्रकल्पामध्ये स्पोक व हब हे मॉडेल वापरण्यात येणार आहे. स्पोकमध्ये उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असून, त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी अतितत्काळ सेवा दिल्या जातात. अशा रुग्णालयांचा समावेश आहे.
सोलापुरातील उपजिल्हा रुग्णालयात देखील या सुविधा देण्यात येणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण आल्यावर त्याचा ईसीजी काढला जाईल आणि तो माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने क्लाऊड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून तज्ञांकडे पाठविला जाईल. औषधोपचाराबाबत दहा मिनिटांत मार्गदर्शन केले जाईल.
स्पोक पद्धतीमध्ये रुग्णांचा ईसीजी करून हृदयविकाराचा झटका आला की नाही, याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाणार आहे.
गोल्डन अवर म्हणजे काय?
- बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे दिसताच, त्यानंतर दोन तासांचा कालावधी उपचारासाठी ‘गोल्डन अवर’ समजला जातो. कारण या काळात हृदयाला होणारा रक्तपुरवठा वेगाने खंडित होतो. त्यामुळे हृदय बंद पडण्याची शक्यता असते. रुग्ण दोन तासांत हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यास तो वाचण्याची शक्यता अधिक असते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णाच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात पोहोचायला सरासरी १० ते १२ तासांचा कालावधी लागत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्टेमी प्रकल्प सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात या सुविधा देण्यात येणार आहेत. हृदयरोगाचा झटका आल्यानंतर रुग्णावर त्वरित उपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यानंतर पुढील उपचारासाठी त्याला शहरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर