एकाच दवाखान्यात मायलेकांना उपचार; घरी आले, सोडला एकापाठोपाठ प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:57+5:302021-05-22T04:20:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडवळ : आई व मुलगा दोघेही आजारी असल्याने त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी नेले...दोघांनाही उपचार सुलभ व्हावे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवळ : आई व मुलगा दोघेही आजारी असल्याने त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी नेले...दोघांनाही उपचार सुलभ व्हावे म्हणून एकाच खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचार घेऊन दोघेही रात्री एकाच दिवशी वडवळला आले अन् सकाळी ८ला आईचे निधन झाले अन् आई गेल्याचे कळताच ११ वाजता मुलाचेही निधन झाले. हा हृदयद्रावक प्रसंग ओढावला वडवळच्या नागनाथ मंदिराचे पुजारी असलेल्या शिवपुजे कुटुंबावर.
वडवळ येथील श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीचे माजी अध्यक्ष महादेव बाबाजी शिवपुजे व त्यांची आई पार्वती शिवपुजे याना काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे सोलापूर येथील वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी दोघांनाही एकाच दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले. उपचारास प्रतिसाददेखील मिळत होता अन् गुरुवारी २० मे रोजी रात्री दोघांना दवाखान्यातून सोडण्यात आले. मात्र शुक्रवारी २१ मेला सकाळी ८ वाजता आई पार्वतीचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करून नातलग घरी आले, तर महादेव शिवपुजे याना तोपर्यंत ही वार्ता समजली. त्यांनाही त्रास होऊ लागल्याने पुन्हा सोलापूरला नेण्यासाठी धावपळ करेपर्यंत महादेव शिवपुजे यांनीही प्राण सोडला.
---
नियतीने घरी घडू दिली नाही भेट
दवाखान्यात एकत्र उपचार घेणारे मायलेक घरी आल्यावर मात्र एकमेकांना सोडून गेले. नियतीने घरी आल्यानंतर त्यांची भेट घडू दिली नाही. या हृदयद्रावक घटनेने वडवळकरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. पार्वती शिवपुजे यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. तर महादेव शिवपुजे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
----