वृक्ष-वेलीप्रेमींनी मोबाईल अॅपवरून केली ऑनलाइन परसबागेची सैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:34 AM2020-07-07T11:34:22+5:302020-07-07T11:37:42+5:30
‘परसबाग सोलापूर’चा उपक्रम; रोपे, बीजांच्या माहितीची देवाण-घेवाण
सोलापूर : कोरोना लॉकडाऊननंतरही शासकीय, खासगी कार्यालयात काहीअंशी ऑनलाइन काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेसही सुरू आहेत. याच पद्धतीने सोलापुरातील बागप्रेमी मोबाईल अॅपचा वापर करून व्हर्च्युअल बागभेटीचा उपक्रम आयोजित करीत आहेत. त्यामध्ये बाग, परसबागेतील प्रत्येक रोप अन् त्याच्या बिजांसंदर्भात माहितीचे आदान - प्रदान करीत आहेत.
परसबाग सोलापूरची शहरातील परसबाग प्रेमी, पर्यावरणावर प्रेम करणाºयांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून बागेसाठीची माहिती, रोप, बिया यांचे मोफत आदान-प्रदान केले जाते. सोलापूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जावे यासाठी हा ग्रुप सुरु करण्यात आला आहे.
या ग्रुपच्या माध्यमातून आठवड्यातून एका सदस्याच्या घरी असलेल्या बागेला भेट दिली जाते. तिथे सगळे ग्रुपमधील सदस्य ठरलेल्या वेळी येतात. ज्यांनी बाग फुलविली ते बागेची माहिती देतात. यातून नव्या कल्पना आकाराला येतात. तसेच काही रोप वाढवताना येणाºया अडचणींवर कशी मात करायची हे देखील सांगितले जाते.
मागील तीन महिन्यांपासून बागप्रेमींनी कोणत्याही सदस्याच्या बागेला भेट दिली नव्हती. काही नियम लागू असल्याने अडचणी येत होत्या. यावर पर्याय म्हणून आॅनलाईन भेट देण्याचे ठरले. सर्व सदस्यांनी होकार देत या नव्या संकल्पनेला साथ देण्याचे ठरले. भवानी पेठ येथील जितेंद्र भडंगे यांच्या बागेला आॅनलाईन भेट देण्यात आली.
खराब झालेला माठ, पाण्याच्या टाकीने नवा लूक
जितेंद्र भडंगे यांच्या बागेमध्ये अनेक वस्तूंचा पुनर्वापर करण्यात आला आहे. खराब झालेला माठ, पाण्याची टाकी, नारळाच्या झाडाचा बुंधा, कुलर, फ्रीज यांचा पुनर्वापर करुन त्यांनी बागेला नवा लूक दिला आहे. कमळ, लिली, मनी प्लांट, निशिगंध, परपल हर्ट, रातराणी, बेबी सनरोज, आंबे अशी अनेक देशी- विदेशी झाडे फुलविली आहेत. प्रत्येक झाडावर ते कोणत्या प्रकारचे आहे याची माहिती लिहिली आहे.
मागील तीन महिन्यांपासून बागेला भेट देण्याचा उपक्रम घेण्यात आला नव्हता. आॅनलाईन पद्धतीने बागेला भेट देण्याचे ठरले. दोनदा याचा सराव (ट्रायल) घेण्यात आला. सदस्यांनी देखील उत्साह दाखवत या आॅनलाईन उपक्रमात सहभाग घेतला. येत्या काळात आणखी चांगले उपक्रम घेणे व नव्या बागप्रेमींना सोबत घेण्याचा मानस आहे.
- नारायण पाटील, ग्रुप अॅडमीन