थरथरते हात राबतात १२ तास; भरघोस उत्पन्न घेण्याचा कयास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:35 AM2020-12-14T04:35:17+5:302020-12-14T04:35:17+5:30
सीताबाई चव्हाण या सध्या शिवाजीनगर तांडा येथे एका छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहतात. त्यांच्या पतीला अक्कलकोट संस्थानाकडून १९७० च्या दशकात ...
सीताबाई चव्हाण या सध्या शिवाजीनगर तांडा येथे एका छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहतात. त्यांच्या पतीला अक्कलकोट संस्थानाकडून १९७० च्या दशकात पाच एकर जमीन बक्षीसपत्राद्वारे मिळाली होती. त्यापूर्वी सीताबाईंनी कोणतेही काम पतीबरोबर खांद्याला खांदा लावून केले; पण ३० वर्षांपूर्वी ते संसाराचा अर्धा डाव सोडून निघून गेले. त्यांच्यासोबत एक चित्रपट पाहिल्याची आवठणही त्या न विसरता सांगता. त्यानंतर हिमतीने दोन मुले, एक मुलगी अशा तिघांना थोडेफार शिकवले. नंतर त्यांचे लग्न केले. त्यांचा संसार सुखाचा आहे. त्यांच्या संसारात ढवळाढवळ न करता, माझे वय झाले असले तरी कष्ट करण्यात कणखर आहे, असे त्या सांगतात.
या माउली संस्थानकडून मिळालेली बॅगहळ्ळी रोडवरील पाच एक शेतजमीन स्वत: कसतात. सध्या पहाटे थंडी असली तरी पहाटेच उठून स्वयंपाक करून भाजी-भाकरी बांधून पाच किलोमीटर चालत शेतात जातात. आल्याबरोबर न्याहरी म्हणून एक भाकर खाणार. नंतर सलगपणे तूर कापणीचे काम करतात. दुपारी अर्धा तास जेवण व विश्रांतीसाठी थांबतात. नंतर काम करून दिवस मावळायला लागला की पुन्हा चालतच घराकडे जातात. पाच किमी जाणे व पाच किमी येणे अशा १० किमीचा पायी प्रवास अन् सुमारे १२ तास काम याही वयात त्या आनंदाने करतात. तुम्ही मजूर का लावत नाही, असे विचारले असता, त्या म्हणाल्या, स्वतः काम केल्यामुळे पिकांची नासाडी कमी होते व पैशाची बचत होते. तुरीची पेरणी केल्यानंतर खुरपणीचे काम एकटीनेच केले. सध्या कापणी करून पेंडी बांधण्याचेही काम मीच करीत असल्याचे त्या सांगत होत्या.
तळीरामांची अशी जीरवली...
काही वर्षांपूर्वी शेतात कोणही येऊन रोज दारू पिऊन पिकांची नासाडी करीत होते. एकदा, दोनदा सांगून पाहिले, पण न ऐकल्याने एकेकाला गच्ची धरून कानशीलात लगावली. तेव्हापासून कोणीही शेतीकडे फिरकत नाही. मात्र जनावरे चारायला येणारे गुराखी त्रास वृद्धेला त्रास देतात, असे वाटसरूंनी सांगितले. जिवात जीव असेपर्यंत शेती व्यवसाय करत राहणार असे सीताबाई चव्हाण यांनी सांगितले.
फोटो
१३अक्कलकोट स्टोरी फोटो
ओळी
बॅगेहळ्ळी, ता. अक्कलकोट रोडवरील शेतात तूर काढणीचे काम करताना सीताबाई चव्हाण.