श्रद्धांजली; मुलांसाठीही लिहिणाºया नाटककाराची एक्झिट वेदनादायी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:47 AM2020-05-19T11:47:10+5:302020-05-19T11:47:15+5:30
रत्नाकर मतकरींचे निधन; नाट्य, साहित्य क्षेत्रातून व्यक्त झाल्या शोकसंवेदना
सोलापूर : रत्नाकर मतकरी यांची प्राणज्योत रविवारी रात्री मालवली. रत्नाकर मतकरी यांची १९५५ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. त्यांनी मराठीमध्ये बालसाहित्यापासून नाटकांपर्यंत विपुल साहित्य लेखन केले होते. मुलांसाठीही प्राधान्याने लिहिणाºया या श्रेष्ठ नाटककार, कथाकाराच्या निधनामुळे सोलापूरच्या नाट्य, साहित्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
प्रकाश यलगुलवार (अध्यक्ष, नाट्य परिषद): बालनाट्य चळवळीदरम्यान आमची रत्नाकर मतकरी यांच्याशी भेट झाली होती. रत्नाकरी मतकरी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. लेखक, नाटककार, रंगकर्मीसह ते बालनाट्य चळवळीतही रमले. त्यांच्या जाण्याचे या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
विजय साळुंके (अध्यक्ष, उपनगरीय शाखा) : मी स्वत: त्यांच्या काही नाटकांचा प्रकाशयोजनाकार राहिलो आहे. मुंबई येथील एका स्पर्धेदरम्यान त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या नाटकांचे लेखन हे वास्तवाला धरून होते. बालनाट्याच्या चळवळीत त्यांचे मोठे कार्य आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली.
आनंद खरबस (सदस्य, अ. भा. नाट्य परिषद) : रत्नाकर मतकरी यांचे लेखन हे ज्वलंत प्रश्नावर असायचे. त्यांनी २५ वर्षांपूर्वी लिहिलेले नाटक आजही अनेकांना रंगभूमीवर आणावी वाटतात. ही नाटके रंगभूमीवर आली तर चांगली चालतील. नाटकात साहित्यिक भाषा न वापरता व्यावहारिक भाषा वापरायची. आमच्यासाठी ते आदर्श आहेत.
प्रा. दीपक देशपांडे (हास्यसम्राट) : मुंबई येथे १९७८ ला राज्य नाट्य स्पर्धा झाल्या होत्या. दोन तास एक नाटक असावे, असा तिथे नियम होता. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले नाटक दीड तासात संपले. तरी देखील नाट्य परीरक्षण करणाºयांनी या नाटकाला पहिले बक्षीस दिले. इतक्या ताकदीचे त्यांचे लिखाण होते.
गुरू वठारे (नेपथ्यकार) : नागपूर येथे ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये आमची भेट झाली. यादरम्यान प्रायोगिक रंगभूमी विषयावर आमची चर्चा झाली. बुकिंग कसे आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याविषयी बोललो. त्यांनी लिहिलेले ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक सोलापुरात तुफान चालले.
रत्नाकर मतकरी आणि सोलापूर
- १९७५ नंतर नाट्य आराधनातर्फे खडकीकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भयकथा सांगण्यासाठी आणखी एकदा ते सोलापुरात आले होते, अशी आठवण शशिकांत लावणीस यांनी सांगितली. त्यांची वैयक्तिक ओळख होती. त्यांनी लिहिलेल्या काही एकांकिका आम्ही सोलापुरात केल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’ ही त्यांनी लिहिलेली कथा. या कथेवर राज्य नाट्य स्पर्धेत नाटक करायला परवानगी द्या, यासाठी आम्ही बोललो होतो. त्यावेळी त्या कथेवर चित्रपट निघत असल्याने आम्हाला परवानगी मिळाली नाही. त्यांच्या एकांकिका आम्ही केल्याने विविध स्पर्धेत आम्हाला बक्षिसे मिळाली, अशी आठवण शशिकांत लावणीस यांनी सांगितली.