शरद पवारांना कोण बोलणार ? मग नेते शोधायचे सुधाकरपंतांना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:32 PM2020-08-19T14:32:37+5:302020-08-19T14:35:24+5:30
ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांच्या निधनानंतर नेतेमंडळींनी दिला आठवणींना उजाळा
राकेश कदम
सोलापूर : जिल्ह्यात विजयसिंह मोहिते-पाटील, गणपतराव देशमुख, कै. ब्रह्मदेवदादा माने, वि. गु. शिवदारे, सुधाकरपंत परिचारक, भाई एस. एम. पाटील, दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, राजन पाटील, दीपक साळुंखे, बबन आवताडे यांनी एक गट बांधला होता.
या गटाचे व्यवस्थापक म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जाते. यापैकी एकाही नेत्याच्या घरात कुरबुर झाली तर ती परिचारक दूर करायचे. नेत्या-नेत्यांमध्ये वाद सुरू झाले की, अनेक नेते पंतांच्या वाड्यावर धाव घ्यायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जिल्ह्यात दरवेळी वेगवेगळे डाव टाकले जायचे. अनेक नेते बोलायला घाबरायचे; पण हे काम सर्व नेत्यांनी पंतांवर सोपविले होते.
केवळ शरद पवारच नव्हे तर राज्यातील मंत्र्यांनाही खडे बोल द्यायला परिचारक तयार असायचे. माजी आमदार राजन पाटील पंतांच्या आठवणी जागवताना म्हणाले, स्वत:चे घर चालवावे या पद्धतीने पंत आणि आमचे जुने नेते जिल्हा बँक आणि इतर संस्था चालवायचे.
बँकेत संचालकांना येण्या-जाण्याच्या खर्चाचे किरकोळ पैसे पाकिटात दिले जायचे. पंत पैसे काढून घेतल्याने रिकामे पाकीट शिपायाच्या ताब्यात द्यायचे. हे पाकीट दुसºया कोणत्या तरी कामाला वापर म्हणून सांगायचे. विधिमंडळात १५ वर्षे मी त्यांच्या बाजूलाच बसून होतो. माझ्या लोकनेते कारखान्याच्या उभारणीत पंतांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या कर्जासाठी ते सांगली अर्बन बँकेत आले होते. आपली संस्था कशी टिकली पाहिजे याचा आलेखही त्यांनी घालून दिला होता.
तुम्हीच काहीतरी मार्ग काढा...
२००४ मध्ये राष्ट्रवादीने पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार दिला. या उमेदवाराच्या प्रचाराचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्न उभा राहिला. शरद पवारांसोबत एक बैठक झाली. या बैठकीनंतर पंत पवारांकडे गेले. आम्ही आमच्या भागातील प्रचाराचा खर्च करू; पण सांगोला, मोहोळसह इतर भागातील लोक खर्च भागवू शकणार नाहीत. हा खर्च करून हे लोक अडचणीत येतील. तुम्हीच काहीतरी मार्ग काढा, असे त्यांनी पवारांना सांगितले आणि सूत्रे फिरली.