स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा ध्वजाच्या रंगाची सजावट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:02 AM2023-08-15T10:02:54+5:302023-08-15T10:03:03+5:30
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत असते.
पंढरपूर : स्वातंत्र्य दिन असल्याने १५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. विठ्ठालाच्या भाविकांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा ध्वजाच्या रंगाची सजावट व आकर्षक व मनमोहक अशी सुंदर आरास करण्यात आली आहे.
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत असते. याच एक भाग म्हणून ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ही विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या चारखांबी, सोळखांबी, विठ्ठल मंडप, रुक्मिणी मंडप यादी परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. राष्ट्र ध्वजाच्या रंगाच्या फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.
विठ्ठल व रुक्मिणी नामदेव पायरी जवळ व श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप परिसरात राष्ट्र ध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यामुळे या भाविकांनी मंदिर पाहण्यासाठी व विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तसेच मंदीरात येणाऱ्या भाविकांना अधिकच प्रसन्न वाटत होते.